२ जुलै

गुरुसेवा करणे म्हणजे काय ?

साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची ? जप, तप, नेम, याग वगैरे आपण कशाकरिता करतो ? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून; तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? म्हणून, साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही; नाहीतर त्याचाच अभिमान होतो, आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ती करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे तुम्हाला वाटते का ? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच होत नसते; गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा करा म्हणून मागतो; तेव्हा, माझी सेवा करायला तुम्ही येता, का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता ? माझ्याजवळ येऊन, मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही; पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे.

‘ मला सर्व कळते ’ असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच; कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की, मला सर्व कळते आहे. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की, त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे; म्हणजे, दैववशात् जरी आपण गुरूपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दु:ख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हांला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही; ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवितो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे.

१८४. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे.