७ डिसेंबर
नाम आणि प्रेम ही जुळी भावंडे आहेत.
साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो, आणि विषयात तो इतका तल्लीन होतो, की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दु:खालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटते. पण वास्तविक, आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचे सांगणे आहे. ‘ मना ’ ला उलटे केले की ‘नाम’ हा शब्द तयार होतो. याचा अर्थ असा की, नाम घेणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरविणे. नाम म्हणजेच ‘ न मम ’. प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजेच नाम घेणे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर, जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा.
निर्गुणाला एक जुळे झाले; ते म्हणजे नाम आणि प्रेम. दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत. एकाला धरले की दुसरे त्याच्या मागे येते. आज आपले प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तींवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतले आहे. त्या कारणाने, भगवंतावर प्रेम करून त्याच्यामागे नाम येईल अशी आपली अवस्था नाही. गोपींची तशी अवस्था होती. पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो. ते झाले की भगवंताचे प्रेम आपोआप येईल. घरादारावर प्रेम सहवासाने बसते; मग नामाचा सहवास केला तर प्रेम का लागणार नाही ?
खरोखर, या जगात कुणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचे बारसे पाहाणे जसे शक्य नाही, तसे ‘ मी कोण आहे ? ’ हे बुद्धीने ओळखणे शक्य नाही. खरी सत्य वस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही; पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ, भीती, कल्पना इत्यादि आपणच उत्पन्न करतो. नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील, वाहणाऱ्या पाण्याची मजा अनुभवता येते; त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंत:करणाला पटले, तो विषयामध्ये राहून देखील, होणाऱ्या सुखदु:खाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वत: अलिप्त राहील.