१० डिसेंबर
राम ठेवील त्यांत समाधान राखावें ।
प्रपंचीं राहून समाधान । हेंच मोठें ज्ञानाचें ज्ञान ॥ भगवंताचा हात जेथें । समाधान सुख राहातें तेथें ॥ राम ठेवील त्यांत समाधान राखावें । हाच सुखी होण्याचा मार्ग जाण ॥ रामापायीं अनन्य झाला । समाधान चालत येई घराला॥ ज्याचे अंत:करणांत समाधान । तेथें भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ति जाण ॥ आपलें असमाधान होण्याचें कारण । रामाहून दुसऱ्याचें झालों आपण ॥ उपाधिरहित रामास पाहावें । मध्यंतरीं चित्त कोठें न गुंतवावें ॥ चित्त गुंततां मध्यस्थळीं । परमात्म्याची प्राप्ति दुरावली ॥ भगवंताचें स्मरण । तसेंच भगवंताचें आगमन । पुण्याईशिवाय घडत नाहीं जाण ॥ श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास । समाधान राखावें खास॥ दाता एक रघुनंदन । हा भाव ठेवावा मनांत । त्यास दैन्यपण न येईल जगांत ॥ धर्माचें रक्षण । ठेवतां परमात्म्याचें स्मरण ॥
राम आपल्या दासावरी । नित्य कृपा करी ॥ राम परमात्मा कृपा करतो । सर्व चुकीची क्षमा करतो ॥ पुन्हा वाईट न वागावें । याबद्दल जबाबदारीनें वर्तावें ॥ ‘ अंतीं घेतां माझें स्मरण । मी उद्धरीन त्यास आपण’। हें खुद्द भगवंताचें वचन । तेथें नसावें शंकेचें कारण ॥ रघुनाथावांचून सुखी झाला । असा नाहीं कोणीं पाहिला, ऐकिला ॥ मीपणाचा सोडावा अभिमान । तोच एक भगवंताचा झाला जाण ॥ राजाची झाली भेट । खालच्यांचें नाहीं महत्त्व तेथें । तैसें जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें ॥ आजवर रामानें सांभाळ केला । तो आजहि नाहीं निजलेला ॥ पण त्याची जागृति । असे आमचे हातीं ॥ काळावर ज्याची सत्ता । त्याचे चरणीं ठेवावा माथा । मग धोका नाहीं ही मानावी सत्यता ॥ राम ज्याच्या हृदयीं करी वास । तेथें ऋद्धिसिद्धी पडल्या ओस ॥ नि:स्वार्थापाशीं भगवंत । हा जाणावा सिद्धांत ॥ राम कर्ता हा ठेवावा भाव । कमीपणाला नाहीं ठाव ॥ कर्तव्य करावें नि:स्वार्थबुद्धीनें । राम खूष होईल त्यानें ॥ ज्याला नाहीं दुसरा उपाय । तेथें मागावें भगवंताचें साहाय्य ॥ परमात्मा ज्याचा साह्यकारी । त्यास धोका नाहीं तिळभरी ॥ देह आहे परतंत्र । मन राखावें भगवंताशीं स्वतंत्र ॥ विषयविरहित मारावी हांक । तुमचे समोर माझा दाशरथि राम ॥ रामानें करावें सर्वांचे कल्याण । दुष्टास सुबुद्धि देऊन जाण ॥ दीनदयाळु परमात्मा राम खास । न ठाव द्यावा विकल्पास ॥ त्याच्याशीं वागावें सत्य । कृपा करील भगवंत ॥ अखंड करा नामस्मरण । जेणें कृपा करील रघुनंदन ॥