२७ एप्रिल

नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी.

आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतीची बंधने पाळा. परस्त्री मातेसमान माना. प्रपंचात एकपत्नीव्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठेसमान माना. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री, परद्रव्य, यांच्याप्रमाणेच परनिंदा हीही अत्यंत त्याज्य आहे. परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने, ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या, नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमचे आईवडील, बायकोमुले, यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा, आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा.

प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते ? तर अगदी थोडे-फक्त चवीपुरते ! परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो; मग ती भाकरी खाता येईल का ? खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील; दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील ! पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही.

प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही; भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा, एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे; पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही ! त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल, तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. यातच जन्माचे सार्थक आहे.

११८. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच.