१५ एप्रिल

सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही.

संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते; ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपणसुद्धा करून घेऊ शकतो; परंतु भगवत्सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा, तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून, वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखे होते. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे ? हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार; मग ते घेऊन काय करायचे ?

पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते ! पैसा हा भुतासारखा आहे; त्याच्याकडून काम करवून घेतले तर तो फार उपयोगी आहे. पण ते न केले तर तो उरावर बसतो! आपण प्रापंचिक माणसे; आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही. पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला ‘नाही’ म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा. म्हणजे किती ? तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला; आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा-पंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला, की बस्स झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे ? आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे ! पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा, आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरिच्छ असावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल; ज्याच्याजवळ विद्वता आहे त्याला विद्वान् म्हणता येईल; ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल; परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही. सावकार कंजूष असेल, विद्वान् गर्विष्ठ असेल, किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदेकरून असतील तोच खरा मोठा होय. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील. म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय.

१०६. पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ.