१४ एप्रिल
संत आपल्याला जागे करतात.
प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते, हे ज्याप्रमाणे संसारात, तसेच परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी. चांगले-वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वत:ला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना, ‘अरे, तू वाट चुकलास,’ अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेव्हा, जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन: चालू लागलो, तर आपण योग्य स्थळी जाऊ.
संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. त्या वेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात, हे केव्हाही चांगलेच होय. संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊ या. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, आणि तो हा की, ‘जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या.’ संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने, त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल ? प्रपंच हा दु:खमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो. त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही, तर त्या वाचनाचा उपयोग नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे. साधन व वाचन बरोबर चालावे.
ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला, अंगी विद्वता नसताना देखील, त्या ग्रंथांचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. विद्वान् हा कल्पनेने सत्यस्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे.