११ एप्रिल

साधनांनी जे साधत नाही ते संतसहवासाने साधते.

अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन येतात, आणि आपले काम झाले की जातात; मग ते राहात नाहीत. संतांनी जगातली राज्ये मिळविली नाहीत. पण त्यांनी स्वत:वर राज्य केले. चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होवोत, चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचेही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामावाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन्नाम जपणे ही संतसंगतच आहे. सद्विचार ही एक सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्‌ग्रंथवाचन यांमुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल.

संतसमागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला, तर आई त्याला ती गोळी देईल का ? जर तिने ती दिली, तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे, जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे, तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन, ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट, नव्हे अनेकपट, आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते.

संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वत:चे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका नि:स्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या-आमच्या घरातले लोकसुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्वव्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच, आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच.

आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष-मत्सर न करणे, सर्व भगद्रूप मानणे, निरभिमान राहणे, सदोदित भगवन्नामस्मरण करणे, आणि संत, सज्जन, सद्‌गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. यांत कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे ? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच.

१०२. प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवितात आणि वागून दाखवितात.