श्रीराम समर्थ
श्री क्षेत्र गोंदवले येथे जन्माष्टमी उत्सव दरवर्षी प्रमाणे श्रावण वद्य प्रतिपदा ते श्रावण वद्य अष्टमी (८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट) दरम्यान अत्यंत उल्हासात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उत्सवकाळात दररोज अखंड नामस्मरण व टाळेवर भजनाचा पहारा होता. दररोज सकाळी श्री गोपालकृष्णास पवमान अभिषेक व श्रींच्या समाधिस रुद्र अभिषेक करण्यात आला. दररोज विविध फुले व पोशाख यांच्या सजलेल्या गोपालकृष्णाची सुवासिनींनी दृष्ट काढली.
उत्सवात जालन्याचे श्री रामदास आचार्य यांची गर्ग संहिता यावर सुश्राव्य प्रवचने झाली. १४ ऑगस्ट म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी मंदिर सुंदर फुलांनी सजले. विद्युत रोषणाई व रांगोळ्यांनी परिसर सुशोभित झाला. रात्री ११ ते १२.३० पर्यंत काल्याचे कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. त्यानंतर बाल कृष्णासाठी न्हाणी, पाळणा, आरती झाली . सामुहिक विष्णु सहस्रनामासह श्रीकृष्णास तुलसीपत्रे वाहण्यात आली. कार्यक्रम संपताना जमलेल्या भाविकांना प्रसाद व सुंठवडा वाटण्यात आला.
१५ ऑगस्ट ला पारण्याच्या दिवशी सकाळी गोपाळ कृष्णासमोर काल्याचे कीर्तन झाले व त्यानंतर दहिहंडीचा कार्यक्रम झाला. अशारितीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव श्रीकृपेने अत्यंत आनंदात संपन्न झाला.