श्रींचा गुरूपौर्णिमा उत्सव २०१७

।। श्रीराम समर्थ ।।

गुरूपौर्णिमेनिमित्त दिनांक २ जुलै ते ९ जुलै  या दरम्यान  गोंदवले येथे समाधिमंदिरामध्ये विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम झाले. गुरू पौर्णिमा उत्सवात दररोज सकाळी भजन, रुद्राभिषेक, रामपाठ त्यानंतर दुपारी विष्णुसहस्त्रनाम आदी कार्यक्रम झाले. दिनांक ६ते ८ जुलै या पर्व काळात ३ दिवस श्री रवींद्र पाठक यांचे प्रवचन झाले. यावेळी त्यांनी श्री ब्रह्मानंद महाराजांचा " जेथे दिसे सद्गुरुचरण, तेची आम्हा गोकर्ण " हा प्रसिद्ध अभंग निरूपणासाठी घेतला होता.  त्यानंतर श्री वैभव बुवा ओक यांचे कीर्तन झाले.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी तर आलेल्या रविवारच्या सुट्टीमुळे गोंदवले नगरी राममय झाली होती. हजारो वाहनांची  रात्रभर गोंदवलेच्या दिशेने रीघ लागली होती.' श्रीराम जयराम जयजय राम'  चा गजर सर्वत्र दुमदुमला. रविवारी सकाळी ८. ३० वाजता रामदासी भिक्षा झाली. श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कोठीपासून सुरुवात करून गोंदवले गावातून पालखी प्रदक्षिणा झाली. अखंड नामस्मरण व  भजन (पहारा) सांगता करण्यात आली. या उत्सवासाठी हजारो भाविक गुरुचरणी गोंदवले नगरीत दाखल झाले होते. सुमारे दोन लाखांवर भाविकांनी सद्गुरुंचे दर्शन घेतले तर सुमारे ४५ हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला. राम नाम व अन्नदान हे येथील वैशिष्ट्य असल्याने भाविक सर्वत्र रामनामाचा गजर करताना दिसत होते. शनिवारी रात्री बारा वाजता सुरु झालेल्या दर्शन रांगा रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या.

गर्दीचा विचार करून देवस्थान ट्रस्ट, गोंदवले ग्रामपंचायत यांनी पार्किंगची मोफत व्यवस्था केली होती.  हजारो सेवकांनी सद्गुरू सेवा म्हणून सर्व व्यवस्था अतिशय उत्तम सांभाळली. व श्रीमहाराजांच्या कृपेने उत्सव अत्यंत आनंदात व उत्तम रीतीने पार पडला.