थोरले राममंदिर, शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळा क्षणचित्रे

।। श्रीराम समर्थ ।।

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी स्थापन केलेल्या थोरले श्रीराम मंदिरात रामजन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. दर वर्षी श्रीरामनवमीचा उत्सव होतो. यंदा मात्र हा सोहळा विशेष उल्लेखनीय होता. तो मंदिराला १२५ वर्षे पूर्ण झाल्याने ! या वेळी गोंदवल्यात हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते .

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे श्रीराम भक्त म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या राहत्या घराशेजारीच १८९२ मध्ये श्रीराम मंदिराची स्थापना केली होती . गुढीपाडव्यापासून गोंदवल्यात श्री रामनवमीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली होती . यात अखंड नामस्मरण व पहारा , पंचपदी , भूपाळ्या , काकड आरती, पवमान व रुद्राभिषेक, करुणाष्टके, रामपाठ व विष्णूसहस्त्रनाम, आरती आदी कार्यक्रम रोज सुरु होते. रोज सकाळी श्री रवींद्र पाठक यांचे रामकथा निरूपण व सायंकाळी श्री सदानंदबुवा गोखले यांचे कीर्तन झाले.

रामनवमीच्या दिवशी थोरले व धाकटे श्रीराम मंदिर पुष्पमालांनी सजविले होते. संपूर्ण मंदिर व मंदिरासमोरील मंडप भाविकांनी फुलून गेला होता. राम जन्मावेळी संपूर्ण परिसर श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमला अन भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. येथील थोरले श्रीराम मंदिरातील राम १२५ वर्षांचा झाल्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर फुलून गेला होता. भाविकांना सुंठवडा व समाधी मंदिरात भाविकांसाठी महाप्रसाद वाटप केला.

तसेच चैत्र पौर्णिमा, मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंतीचा उत्सवही मोठ्या थाटात पार पडला. भाविकांच्या सोयीसाठी समाधी मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे दोन्ही उत्सवात उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.