श्रींचा पुण्यतिथी उत्सव २०१६- वर्ष १०३

श्रीराम समर्थ

 ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १०३,वा पुण्यतिथी महोत्सव बुधवार दि . १४ डिसेंबर (मार्गशिर्ष वद्य प्रतिपदा) ते शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०१६, (मार्गशिर्ष वद्य दशमी ) या काळात श्रीक्षेत्र गोंदवले येथे उत्साहाने व अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

कोठी पूजन :

उत्सवाची सुरुवात श्री ब्रह्मानंद महाराजांनी आखून दिलेल्या पद्धतीनुसार कोठी पूजनाने झाली. पहिल्या दिवशी समाधी मंदिरातील पहाटेची काकड आरती झाल्यानंतर ६च्या सुमारास ब्रह्मानंद मंडपात सनई वादन, वेदघोष पठण व ईशस्तवन झाल्यानंतर कोठी पूजनास सुरुवात झाली. यावेळी गोंदवले संस्थानचे विश्वस्त डॉ. अवधूत गुळवणी यांनी सपत्नीक कोठीपूजन केले. श्री ब्रह्मानंद महाराजांनी दिलेल्या अक्षय पिशवीतल्या चांदीच्या रुपयांची प्रथम पूजा करण्यात आली.  अक्षय पिशवी बरोबर श्रींच्या पादुकांची आणि श्री महाराज व श्री ब्रह्मानंद महाराजांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. हा सोहळा पाहण्यास ब्रह्मानंद मंडपात मोठ्या संख्येने श्रींची भक्तमंडळी उपस्थित होती. श्रींची आरती झाल्यानंतर भक्तमंडळी 'रघुपती राघव राजाराम' भजन म्हणत गोशाळेत आली  व तेथे गोमातेचे पूजन व आरती झाली.  सर्व गाईना रंगीत झुली घालून सजविण्यात आले होते.

त्यानंतर स्वयंपाघकरातील चुलीचे पूजन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. इथे स्वयंपाकघरातील सर्व वस्तू, फळे भाज्या यांची आकर्षक मांडणी केली होती. संपूर्ण स्वयंपाकघर व मुख्य धान्याची कोठी, रांगोळी व फुलांची आरास करून सजविण्यात आली होती. पुढे सर्व भक्तमंडळीनी ध्यानमंदिरात येवून श्रींच्या प्रतिमेसमोर एक माळ नामजप केला, अशा रितीने कोठीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कोठी पूजनानंतर श्रींच्या समाधिपुढे सकाळचे श्रीफळ ठेवून, गोपालकृष्ण मंदिरासमोर पंचपदी भजन झाले व नामजप आणि भजनाच्या अखंड पहाऱ्यास सुरुवात झाली. 'श्रीराम जयराम जय जय राम'  या तारक मंत्राचा नामजप माळेवर व 'रघुपति राघव राजाराम' या भजनाचा टाळेवर अखंड पहारा प्रतिपदेपासून दशमी पर्यत असतो. उत्सव काळात रोज सकाळी ९ वाजता श्रींच्या पादुकाची षोडशोपचार महापूजा झाली.

उत्सवांतील भक्तांसाठी मोठे आकर्षण म्हणजे श्रींची पालखी!  रोज सकाळी १० च्या सुमारास श्रींच्या पादुकांची व प्रतिमेची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघायची. पालखीपुढे सनई चौघडा, भजनी मंडळाच्या दिंड्या, फुलांनी सजविलेल्या रथात श्रींचा फोटो, अग्रभागी तालावर नाचणारा बत्ताशा घोडा अशी भव्य मिरवणूक निघायची. पालखी मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी काढून फुलांची सजविलेला असायचा व  ग्रामस्थ पाटघड्या घालून तर गावांतील सुवासिनी जागोजागी आरती ओवाळून श्रींच्या पालखीचे स्वागत करायच्या. गांवातील शाळेच्या मुलांची लेझीम पथके, पौरणिक पेहराव केलेली लहान मुले या दिंडीत सामिल व्हायची.  पालखी गांवातील प्रत्येक मंदिरात जावून तेथे आरती करून परत समाधि मंदिरात यायची,  प्रवेशद्वारावर श्रींच्या पादुका व प्रतिमेला सुवासिनी औक्षण केले जाई. त्यानंतर रामनामाच्या जयघोषात पुन्हा पालखी समाधि मंदिरात स्थानापन्न होई.

भाविकांना, गायन, भजन कीर्तन सेवेची पर्वणी संपूर्ण उत्सवकाळात लाभली. प्रसिद्ध गायक महेश काळे, पं उल्हासजी कशाळकर, सौ पदमाताई तळवलकर, सौ मंजुषा पाटील यांनी आपली गायनसेवा श्रींच्या चरणी रुजू केली. नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळाला. गावोगावच्या भजनी मंडळानी  आपली भजनसेवा सादर केली.

श्रींचे पुण्यस्मरण, गुलालाचा मुख्य कार्यक्रम :

सालाबाद प्रमाणे २३ डिसेंबरला गुलाल कार्यक्रम  प्रसाद मंडपात संपन्न झाला. यंदा 'कमळपुष्पात बसलेली श्रींची प्रतिमा' असलेली सुंदर अशी आरास करण्यात आली होती. समाधि मंदिरातील काकड आरती झाल्यानंतर पहाटे ४:४५ वाजता सनई वादनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम वेदघोषाचे पठण होऊन  'रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम'' हे भजन एकचित्ताने सामुदायिक रित्या म्हटले. नंतर श्रींच्या नित्य उपासनेतील ''हाची सुबोध गुरूंचा '' या  तेरा  श्लोकांचे  सामुदायिक पठण झाले. गुलालापूर्वी श्री रवींद्र पाठक यांचे प्रवचन प्रचंड जनसमुदायाने  एकाग्र चित्ताने ऐकले. प्रवचन संपत्या क्षणीच समाधी मंदिराच्या गाभाऱ्यातील भक्तगण 'श्रीराम ,श्रीराम असे संथपणे एका सुरात एका लयीत म्हणत असताना कार्यक्रमास जमलेले भाविक शांतपणे ऐकत श्रींचे स्मरणात अंतमुर्ख अवस्थेत होते.  बरोबर ५:५५ मिनिटांनी सर्व भक्तमंडळी एकाच वेळी फुले उधळत व श्रीराम ,श्रीराम असा गजर करत पुण्य पर्वकाळ साजरा केला. श्रींची आरती झाल्यानंतर हा कार्यक्रम संपला व यथावकाश सर्व भक्तगण आपापल्या घरी परतले. 

हा कार्यक्रम पाहण्यास व श्रींचे दर्शनास लाखाहून अधिक भक्तगण गोंदवल्यास जमले होते. सर्वाना गुलालाचा सर्व कार्यक्रम  तसेच श्रींच्या पादुकांची पुजाअर्चा व समाधिवर फुले उधळण्याचा कार्यक्रम पाहाता यावा म्हणून मंदिर परिसरात व गांवात एकूण सहा मोठे LED स्क्रीन लावण्यात आले होते. शिवाय वृद्ध, आजारी अशा भक्तमंडळींसाठी समाधी मंदिरात बसून कार्यक्रम पाहण्याची सोय करण्यात आली होती.

यावेळी नोटाबंदीमुळे भाविकांची देणगी देण्यास व ग्रंथ खरेदीसाठी swipe मशीनचा वापर करण्यात आला. शिवाय संस्थानच्या वेबसाइटवरून ऑनलाईन डोनेशनची व्यवस्था करण्यात आली होती.

संपूर्ण उत्सवकाळात लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले, सुमारे सव्वालाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. एकंदरीत यंदाचा उत्सव शांततेने, मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. ही श्रींचीच कृपा.