श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव २०१६, क्षेत्र गोंदवले

भगवंताच्या नामात रंगण्याची कला साधावी म्हणून उपासनेच्या विविध अंगांची आवश्यकता असते. त्याकरिता गोंदवले येथे विविध उत्सव साजरे केले जातात. त्यातील श्री कृष्ण जन्माष्टमी हा एक महत्त्वाचा उत्सव  आहे. या वर्षी १९ ते २५ ऑगस्ट २०१६ या कालावधीत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. उत्सवाच्या काळात रोज श्री गोपालकृष्णास पवमान अभिषेक, तसेच समाधीवर रुद्र  अभिषेक आम्हाला पाहण्याची संधी लाभली.  अखंड नामस्मरण व टाळेवर भजनाचा पहारा होता. सायंकाळी सुवासिनींकडून तेवत्या निरांजनाच्या सोबतीनं दृष्ट काढण्याचा कार्यक्रम सुद्धा पाहता आला. 
या उत्सवाचे निमिताने जालन्याचे माननीय रामदास आचार्य यांनी श्रीमहाराजांचे चरित्र, नाम माहात्म्य तसेच श्रींच्या सत्शिष्यांचे जीवनकार्य यावर प्रवचनाद्वारे आपल्या अमोघ शैलीत उपस्थितांचे समाधान केले.
२४ ऑगस्ट श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी समाधिमंदिर तसेच श्री गोपालकृष्णांचे मंदिर सुंदर अशा पाना फुलांच्या सजावटीने सुशोभित केले होते. आकर्षक रोषणाई तसेच विविध रंगी सृजनशील रांगोळ्यांनी सारा परिसर देखणा, नयनरम्य झाला होता. श्री ब्रह्मानंदमंडपात श्रीकृष्ण चरित्रातील देखावा व त्यासमोरील विविध फळांच्या आकर्षक कलाकृती लक्ष वेधून घेत होत्या. जन्मादिनानिमित्त रात्रौ ११ ते १२.३० पर्यंत मा. आचार्यांचे कीर्तन होऊन "श्रीकृष्ण जन्म काल" साजरा झाला. न्हाणी, पाळणा व आरती झाली. सामुहिक विष्णू सहस्र नामाच्या पठणास सुरुवात झाली. श्रीगोपालकृष्णास तुलसी वाहण्यात आल्या. उपस्थित भाविकांना सुंठवडा प्रसादाचे वाटप झाले अन कार्यक्रम समाप्ति झाली. 
श्री आचार्यांनी २५ ऑगस्टला सकाळी १० वाजता गोपालकृष्णासमोर काल्याचे कीर्तन केले व दहीहंडीचाही कार्यक्रम साजरा झाला. गावजेवणानिमित्त समस्त गावकरी व सर्व उपस्थित भक्त महाप्रसादाचा लाभ घेऊन मोठ्या आनंदात माघारी परतले. श्रीकृपेने मोठ्या आनंदात पार पडलेला हा उत्सव आमच्या सारख्या नाम प्रेमींना एक अमोल अशी आठवण ठरावी. प्रत्येक जण मोठ्या आनंदाने आपल्या घरी परतला.