श्रींचा गुरूपौर्णिमा उत्सव २०१६ ( क्षणचित्रे )

'श्री राम समर्थ
गोंदवले येथे १२ जुलै ते १९ जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला श्रींच्या समाधी मंदिरात अखंड नामस्मरण व टाळेवर भजनाचा पहारा, त्रिकाल आरती, रुद्राभिषेक, कीर्तन, नित्य उपासना असे विविध कार्यक्रम आयोजिले होते.
रोज सकाळी ९ ते ११ दरम्यान समाधि मंदिरात श्री सदगुरु लीलामृत या पोथीचे सामुहिक पारायण होते .
गुरुपौर्णिमेच्या पर्वकाळात श्री रविंद्र पाठक यांची ३ दिवस, सकाळी ७.३० ते ८.३० व दुपारी ४ ते ५ या वेळात प्रवचने झाली. त्यांनी जगदगुरू श्री तुकाराम महाराजांचा 'गुरुचरणी ठेविता भाव' हा अभंग निरुपणास घेतला होता.
सात दिवस पनवेलचे ह. भ. प. श्रीराम चितळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
१३ जुलै रोजी गोंदवले संस्थानबद्दल विश्वासार्ह माहिती देणारे संस्थानचे अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट) गुरूपौर्णिमेच्या पर्वकाळात श्रीचरणी अर्पण करण्यात आले. सर्व जगभरात वास्तव्य करणाऱ्या श्रीमहाराजांच्या भक्तांना या संकेत स्थळाचा लाभ घेता येईल.
या उत्सव काळात रविंद्र पाठक यांचे 'कंठी राहो नाम' हे श्री जनार्दन स्वामींच्या अभंगावरील निरूपणांवर आधारीत पुस्तक व 'भावार्थ मनोबोध' (भाग १) हे श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवरील निरूपणावर आधरित पुस्तक, प्रकाशित करण्यात आले. ही दोन्ही पुस्तके श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आली .
१९ जुलै, गुरूपौर्णिमेच्या दिवशी भल्या पहाटेपासून श्रींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री ११ पर्यंत दर्शनाची रांग सुरू होती. सकाळी ८.३० वाजता श्रींची आरती, महानैवेद्य होऊन महाप्रसादास सुरुवात झाली. सुमारे ४१ हजार भक्तांनी महाप्रसाद घेतला
एकंदर गुरुपौर्णिमा उत्सव, अत्यत दिमाखात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.