श्रीरामनवमीला गोंदवल्यात पुन्हा दुमदुमला रामनामाचा जयघोष

सियापती श्रीराम की जय असा एकच जल्लोष झाला अन् श्रीब्रह्मचैतन्यांच्या घरी प्रभू श्रीराम जन्मला. गोंदवल्यातील श्रीराम मंदिरात हजारो भाविकांनी श्रीराम जन्म सोहळ्यानिमित्त पुष्पवर्षाव केला. दोन वर्षांनंतर झालेल्या श्रीरामाच्या दर्शनाने भाविक धन्य झाले.
श्रीमहाराजांनी गोंदवल्यात स्थापन केलेल्या थोरल्या व धाकट्या श्रीराम मंदिरात श्रीरामनवमीचा उत्सव हा आजही मोठया उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून अखंड पहारा सुरू करून पंचपदी भजनाने उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त दररोज पहाटे सनई वादनाने कार्यक्रमांना सुरुवात झाल्यानंतर भूपाळ्या, काकड आरती, रुद्राभिषेक, पवमान, करुणाष्टके व सवाया रामपाठ, विष्णुसहस्त्रनाम, कीर्तन, पंचपदी भजन आदी कार्यक्रम सुरू होते. श्रीरामनवमी दिवशी मंदिर पुष्पमालांनी सजविण्यात आले. सकाळपासूनच अनेक भाविकांनी रामरायाचे दर्शन घेतले. दुपारी ह.भ.प.नंदकुमार कर्वे यांचे थोरले श्रीराम मंदिरात, तर ह.भ.प. सुनील द. काणे यांचे धाकटे श्रीराम मंदिरात श्रीराम जन्माचे कीर्तन झाल्यावर साडेबारा वाजता गुलाल व फुलांच्या वर्षावात जन्मसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर न्हाणी, पाळणा, आरती, तीन श्लोक होऊन सुंठवडा वाटण्यात आला. श्रींची समाधी व श्रीरामाच्या प्रत्यक्ष दर्शनाने भाविक सुखावल्याचे दिसत होते. दरम्यान, ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे भाविकांसाठी थंड पेयांची सोय केली होती. यामध्ये युवकांचा सहभाग मोठा होता. करोनाचे निर्बंध उठल्यानंतर झालेला हा पहिलाच उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला.