श्रींचा १०८ वा पुण्यतिथी उत्सव २०२१ – क्षणचित्रे....

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना देह ठेवून आज १०८ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या समाधी मंदिराची संपूर्ण देखभाल करणारे गोंदवले संस्थान ही एक अध्यात्मिक संस्था असून श्री महाराजांच्या समाधीला केंद्रस्थानी ठेवते. या संस्थानाकरिता श्री महाराजांचे पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांनी आपली तपश्चर्या ओतली आहे. या संस्थानाची  एकून कार्यपद्धती ही त्यांनीच निश्चित केलेली असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा या संस्थानाचा मुख्य प्राण आहे. सगुणाची निष्काम उपासना, नामस्मरण आणि अन्नदान या त्रयीवर संस्थानाचे सारे अध्यात्म आधारलेले आहे आणि हे अध्यात्म संस्थानचे व्यवस्थापन (विश्वस्त मंडळ) आजतागायत नीटपणे जपत आले आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाप्रमाणेच, गोंदवले संस्थानही अनेक संकटाचा सामना करीत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे मर्यादा असूनही श्री महाराजांच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहे. प्रसाद व्यवस्था बंद असली तरी या ना त्या स्वरूपात म्हणजे शिधा वाटप आणि इतर मदत या मार्गाने संस्थान आपला वाटा उचलत आहे. अशा कठीण परिस्थितीत उत्सव मोठ्या प्रमाणात न होता अगदी मोजक्या सेवेकरी आणि जेष्ठ साधकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय व्यवस्थापनाला नाईलाजाने घ्यावा लागला.. 
दिवाळी झाली कार्तिक पौर्णिमा येते की वेध लागतात ते दत्तजयंती आणि त्यानंतर येणाऱ्या श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाचे! नेहमी प्रमाणे उत्सवाची मुहूर्तमेढ विधिवत ५ डिसेंबरला रोवली गेली. उत्सवाची सुरुवात पूर्वापार पद्धतीने  मार्गशीर्ष प्रतिपदा दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी पहाटे ६.३० वाजता ब्रह्मानंद मंडपात कोठी पूजनाने झाली. तत्पूर्वी वेदघोष, ईशस्तवन, भक्तिगीते इ. झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. हे  कोठीपूजन श्री ब्रह्मानंदांनी घालून दिलेल्या पारंपरिक पद्धतीने विधिवत केले गेले.  यात विश्वस्तांद्वारे  श्रींच्या पादुकांचे पूजन, अक्षय बटव्याचे पूजन तसेच कोठीतील पदार्थापासून तयार केलेल्या विविध कलाकृतीचेही पूजन झाले. यात मुख्य आकर्षण होते चिंचवडच्या श्री प्रशांत कुलकर्णी या सिद्धहस्त कलाकाराने केवळ सेंद्रीय गुळापासून साकारलेल्या श्री महाराजांच्या सर्वाग सुंदर प्रतिकृतीचे! पूजन विधी आणि आरती झाल्यानंतर दरवर्षीच्या शिरस्त्या प्रमाणे गोशाळेतील गोमाता पूजन, स्वयंपाकघरातील अग्निपूजन हे सर्व विधिवत पार पडले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वयंपाक घरातील भांड्यांची आकर्षक सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. मुख्य कोठी घरात ही भाज्या, फळे यापासून तयार झालेल्या कलाकृतीही अत्यंत वेधक पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या. वैशिष्ठपूर्ण अशा कोठीपूजनानंतर नामसाधना मंदिरातील सर्व प्रतिमांचे पूजन व रामनाम जपानंतर सर्वजण समाधी मंदिरात परतले. त्यानंतर गोपालकृष्णा समोर अभंग होऊन विश्वस्तांतर्फे अखंड नामजप व भजनी पहाऱ्याला सुरुवात करून देण्यात आली. आता उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव म्हणजे महाराजांच्या भक्तांसाठी  एक पर्वणीच असते. नेहमीची श्रीमहाराजांची प्रिय भक्त मंडळी भेटतात आणि आनंदाला पारावार उरत नाही. काय तो आनंद, उत्साह, आपुलकी, मायेचा ओलावा, प्रेमभाव व आदर! किती किती म्हणून वर्णन करायचे? अगदी विश्वस्तांपासून ते लहान लहान सेवा करणार्‍यांमध्ये आपुलकी दिसत असते एवढेच नव्हे तर अगदी कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा भेटीची ओढ दिसते.
उत्सवातील ठळक घडामोडी आणि वैशिष्ठे:
गोंदवल्यातील नेहमीच्या पुण्यतिथी उत्सवातील पालखी सोहळा अतिशय प्रेक्षणीय असतो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखीचे बदलते रूप पाहण्यास मिळाले. कोरोना निर्बंधामुळे गर्दी टाळण्यासाठी ग्राम प्रदक्षिणा अगदी साध्या पद्धतीने करण्यात आली. दररोज सकाळी  रथा ऐवजी श्रीं च्या पादुका उत्तम रित्या सजविलेल्या वाहनातून नेण्यात येत असत. गावातील सर्व महत्वाच्या मंदिरांना भेट देऊन श्री महाराज मंदिरात परत आल्यानंतर मात्र  श्रींना चांदीच्या पालखीत बसवून समाधी मंदिराच्या ३ प्रदक्षिणा करून पालखी सोहळा संपन्न होत असे. सायंकाळी ही याच पद्धतीने पालखी प्रदक्षिणा होऊन मंदिर परिसर भजन, गायन, जयघोष यांनी दुमदुमून जाई. मर्यादित स्वरूपात  असून ही भक्तजनांच्या उत्साहात कुठलीही कमतरता नव्हती. परंपरा व सद्य स्थिती यांचा मेळ घालून उपासनेला धक्का न लावण्याचे ब्रीद आजही गोंदवले येथे जपले जात आहे.  
दरवर्षीप्रमाणे या उत्सवासाठी ही चिंचवडचे श्री प्रशांत कुलकर्णी यांनी अत्यंत श्रद्धेने ३० दिवस अहोरात्र खपून सेंद्रीय गुळापासून एक अप्रतिम कलाकृती (महाराजांची मूर्ती) तयार केली. ती ह्या उत्सवातील अजून एका आकर्षणाचे केंद्र  ठरले. कोठी पूजनाच्या दिवशी तिचे पूजन करण्यात आले. या कलाकृती साठी कुलकर्णी यांनी ७५ कि. सेंद्रिय गुळाचा वापर केला एवढेच नव्हे तर प्रतिमा उठावदार होण्यासाठी ही वेगळ्या उजळ रंगाचा गुळ वापरून विविध रसायने / रंग वापरणे टाळले हे विशेष. श्री प्रशांत कुलकर्णी हे नुसतेच सिद्ध हस्त कलाकार नसून श्री महाराज कृपांकित साधक आहेत.  श्री महाराजच त्यांना कल्पकता आणि बुद्धी देऊन दरवर्षी उत्सवासाठी निरनिराळ्या कलाकृती करण्याची हृदयातून प्रेरणा देत अशी त्यांची श्रद्धा आहे. 
दत्तजयंती पासूनच श्री महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली. दर्शन रांगेच्या चोख व्यवस्थेमुळे भक्तगण एका प्रवेशद्वारातून (गेट नं २)
 येथून दर्शन घेत (अर्थात मुखदर्शन, व पुढे जाऊन दुसऱ्या प्रवेशद्वारातून (गेट नं १) बाहेर पडत. दर्शन घेऊन जाणाऱ्या भक्तांना, कोरोनाच्या दृष्टीने सर्व काळजी घेऊन प्रसादाची पाकिटे दिली जात होती.  ते भरण्याचे काम करणाऱ्यांचे तर विशेष कौतुक! रामनामाच्या गजरामध्ये सकाळी सहा ते आठ या वेळात अत्यंत भारवलेल्या अवस्थेमध्ये कसे काय काम होऊन जायचे ते समजतच नव्हते. श्री महाराजांच्या शिकवणीप्रमाणे, गोंदवले येथे अन्नदान हे उपासनेच्या प्रमुख अंगापैकी आहे. येथे येणारा प्रत्येक जण नामस्मरणाबरोबरच प्रसादानेही तृप्त व्हावा यासाठी गेली शंभरहून अधिक वर्ष अन्नदान हे व्रत म्हणून सांभाळले गेले आहे. येथे आता काम करणारे तसेच पूर्वीही होऊन गेली सेवेकरी समर्पण भावनेने काम करत असताना, असे अक्षरशः हजारो अनुभव येऊन जातात की नियोजन नसतानाही मानवी शक्ती पलीकडे काम होऊन जाते व श्री महाराज सत्ता रूपाने आहेत याचा स्पष्ट अनुभव येतो.
उत्सव कालात  महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री श्रीकांत देशपांडे यांनी सपत्नीक संस्थानाला भेट दिली.  समाधी मंदिरात श्रीं चे  दर्शन मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर मंदिर आणि मंदिर परिसराची स्वच्छता आणि नीटनेटकेपणाबद्दल संस्थानाची स्तुती केली व येथे आल्यावर मोठे आत्मिक समाधान मिळाल्याची ग्वाही दिली. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही भेट देऊन येथे आल्यावर समाधान मिळाल्याचे सांगितले व संस्थानाला धन्यवाद दिले. 
 उत्सव काळात अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम, चोख व्यवस्था, सर्वांचे प्रेमपूर्ण व्यवहार, पुरुष आणि महिलांचा सुद्धा पूर्णपणे झोकून देऊन सेवाभाव सर्वांच्याच अनुभवास आला. सौजन्याचे नऊ दिवस कसे गेले कळलेच नाही आणि शेवटचा दिवस आला, गुलालाचा पुण्य पर्वकाळ समीप आला, पहाटेपासूनच सर्वांची लगबग सुरू झाली. या प्रसंगासाठी समाधी मंदिर उत्तम रीतीने सजविण्यात आले. मंदिर परिसरात विविध ठिकाणी सुंदर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. गुळापासून केलेली श्री महाराजांची मूर्ती व पादुका ठेवण्यासाठी एका नौकेचा देखावा करून गुलालाच्या दिवशी समाधी मंदिरात भाविकांच्या दर्शना साठी ठेवण्यात आला. रामनाम ही भव सागरात पार होण्यासाठी नौका असून सदगुरु हे नावाडी आहेत, ही  संकल्पना घेऊन  प्रशांत कुलकर्णी यांनी केलेला अविष्कार  सर्वानाच भावला. पहाटेची काकड आरती, श्रीच्या समाधीचे पूजन हे सर्व होऊन गुलालाच्या मुख्य कार्यक्रमास ठीक ५ वाजता सुरुवात झाली. या प्रसंगी प्रथम वेदघोष व नंतर रघुपति राघव राजाराम हे भजन होऊन श्री रामदास आचार्य यांचे उद्बोधक प्रवचन झाले. आणि ज्या क्षणाकरता हा उत्सव साजरा होतो तो क्षण जवळ आला.   महाराजांच्या शेवटच्या दिवसाचा प्रसंग  ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून कानावर पडत होता आणि  डोळ्यांमधून अखंड झरा वाहत होता. समोर जणू काही प्रत्यक्ष महाराज उभे आहेत आणि परत परत सांगत आहेत  की "एक वेळ राम बोला" आणि त्यानी जणू ग्वाही सुद्धा दिली "जेथे नाम तेथे माझे प्राण" !त्यानंतर  ५. ५२ ते ५. ५५ या वेळात समाधी मंदिरातून येणारा धीरगंभीर श्रीराम ! श्रीराम असा घोष  कानी पडत असतानाच  बरोबर ५. ५५ वाजता श्री रामनामाच्या घोषामध्ये श्री महाराजांचा जयजयकार करत समाधीवर फुले/गुलाल उधळले गेली. शेवटी आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे संस्थांनाच्या वेबसाईट वरून अप्रतिमरित्या प्रक्षेपण करून सर्वाना विशेषतः गोंदवल्यास येऊ न शकलेल्या सर्व भक्तांना श्री चे सानिध्य व गोंदवल्यातील नाममय मंगल वातावरणाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. पहाटेच्या गुलालाचा कार्यक्रमानंतर प्रथेनुसार सकाळी ८ वाजता रामदासी भिक्षा फेरी काढण्यात आली.  व नंतर विश्वस्तांतर्फे  श्रींसमोर पुढील वर्षाच्या पुण्यतिथी पर्यंत करावयाच्या १३ कोटी जपाचा संकल्प सोडण्यात आला. 
या ठिकाणी विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट अशी कि मागील वर्षी मंदिर आणि मंदिर परिसरात एकूण २२ कोटी ३३ लाख जप झाला, शिवाय बाहेर गावाहून आलेला जप वेगळा! कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा जप होणे हि महाराजांची किमयाच म्हणावयास पाहिजे. वरील प्रकारची किमया (संकटी रक्षण करण्याची ) गोंदवल्याच्या ज्या शक्तीमुळे  वारंवार होत असते, त्याच शक्तीच्या आधारावर हे संस्थान शतकाचा काळ लोटला तरी ताठ मानेने उभे आहे. कुठल्याही अस्मानी आणि सुलतानी संकटास तोंड देण्यास सक्षम झाले आहे. तीच शक्ती समाधिरुपाने विश्वस्तांस आणि सेवाभावी साधकांस परिश्रम करण्याचे बळ देत असते. या उत्सवामध्ये मिळणारी नामाची शिदोरी घेऊन आपण आपल्या घरी गेलो तर श्रीमहाराज आपणा सर्वांवर आनंदाचा वर्षाव करतील यात शंकाच नाही आणि यातच उत्सवाचे सार्थक आहे.
जय श्रीराम