श्रींचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव २०२० – क्षणचित्रे...

श्रीराम समर्थ 
श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०७ वा पुण्यतिथी महोत्सव श्रीक्षेत्र गोंदवले येथे मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी शके १९४२, गुरुवार दिनांक ३१ डिसेंबर २०२० ते शुक्रवार दिनांक ८ जानेवारी २०२१ या कालावधीत  पार पडला. करोना महामारीमुळे यावर्षी उत्सव अत्यंत साधेपणाने संपन्न झाला. याच कारणामुळे अत्यंत मोजक्या निवासी भक्तमंडळी व सेवेकरी यांनी समाधिमंदिरात अखंड नामस्मरण, अखंड पहारा, आरती इ. उपासना कार्यक्रम मनोभावे केले.
पहिल्या दिवशी कोठीपूजनचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. रोजच्या आरत्या, पंचपदी ई सर्व कार्यक्रम सोशिअल डीस्टंन्सिंग सर्व नियम पाळून करण्यात आले. 
दरवर्षी गावातून निघणारी पालखी मिरवणूक टाळून 'श्रीं'च्या पादुका वाहनातून श्रीराम भेटीसाठी नेण्यात येत होत्या. 
श्री महाराजांना अन्नदान प्रिय होते. हा वारसा मंदिर समितीने अखंडितपणे जोपासला आहे.  पुण्यतिथी महोत्सव काळात पंचमीला संपूर्ण गोंदवलेकरांसाठी जेवणाचे (प्रसाद) नियोजन करण्यात येते. या वेळी ग्रामस्थांसह भाविकही मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात. यंदा मात्र  समाधी मंदिर समितीने संपूर्ण गावात लाडवाचा प्रसाद घरपोच पोहचविला. मंदिरातील सेवेकरी व कर्मचारी घरोघरी प्रसाद घेऊन आल्याने श्री महाराजच घरी आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
श्रींच्या पुण्यतिथीच्या दिवशी नेहमीप्रमाणे सडा रांगोळीने आवार सजले. आपल्या अत्यंत वैविध्यपूर्ण व सृजनशील कल्पनांनी गेली अनेक वर्ष सजावट करणारे चिंचवड चे श्री प्रशांत कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर्षी कमलपुष्पांनी सजलेल्या भव्य पादुका केल्या होत्या व त्यावर  सद्गुरू चरणांशी लीन भक्त भ्रमर रूपाने दाखविले होते. पहाटेच्या काकडारती मध्ये सर्व नेहमी म्हणत असलेली भूपाळी 'चरण कमली लीन भक्त, भ्रमर गुंगविले' या ओळींचे प्रत्यक्ष साकार स्वरूप उपस्थितांना मोहवून गेले. पहाटेचा काकडा व पंचपदी झाल्यावर, सनईच्या मंगलमय वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम वेदघोष झाल्यावर रघुपती राघव राजाराम च्या भजनाने सर्व वातावरण मंगलमय झाले. त्यानंतर श्री रामदास आचार्य, जालना यांनी थोडक्यात सद्गुरूंचे महात्म्य व या मंगलमय क्षणाचे महत्व प्रतिपादन केले. त्यानंतर श्रींच्या शेवटच्या दिवसाचे भावपूर्ण विवेचन झाल्यावर, दोन मिनिटांच्या अद्भुत शांततेनंतर समाधीमंदिरातील  श्रीराम, श्रीराम अशा अत्यंत पवित्र गजरात या पुण्यपर्वकाळी, केवळ उपस्थितच नव्हे तर सर्वदूर असलेल्या भक्तांनी मनोभावे श्रींच्या चरणी गुलाल व पुष्प वाहून आपली भाव सुमनांजली अर्पण केली. 
या महोत्सवाच्या मुख्य गुलालाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी पहाटे भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुरुवारी व शुक्रवारी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. याच अनुषंगाने प्रशासनानेही खबरदारी म्हणून गोंदवल्यात उत्सवाचे शेवटचे दोन दिवस संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील इतर सर्व दुकानेही या काळात बंद ठेवण्यात आली होती. दरवर्षी मोठ्या पटांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित असतो. मात्र यावर्षी समाधी मंदिरातच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व भक्तांसाठी यावर्षी श्रींच्या YOUTUBE चॅनेल वरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
उत्सव काळात शासनाच्या नियमावलीनुसार गर्दी होणार नाही याची मंदिर व्यवस्थापनाने पूर्णपणे खबरदारी घेऊन नियोजन केले. यामध्ये दर्शनार्थी भाविकांसाठी संपर्क रहित सॅनिटायझर, तापमापक, तीर्थोदक यंत्र ई सुविधांचा वापर करण्यात आला. ठरलेल्या वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे निवास व प्रसाद (अन्नदान) व्यवस्था जरी बंद असली तरी सर्व काळजी घेऊन प्रत्येकाला घेऊन जाण्यासाठी प्रसाद पॅक वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. 
अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीत पार पडलेल्या या उत्सवास श्री महाराजांचा आशीर्वाद,  उत्तम व्यवस्थापन तसेच सर्व भक्तांच्या सहकार्याने कुठेही गालबोट लागले नाही.  महामारीमुळे उत्सवाला उपस्थित राहू न शकलेली भक्तमंडळी मनाने मात्र नक्कीच गोंदवल्यास हजर होती. आपल्या सर्वांच्या भावनेने श्रींचे सान्निध्य व हे नाममय मंगल वातावरण आपल्याला आपल्या घरीच अनुभवास यावे व पुढच्यावर्षी मात्र हे संकट दूर होऊन नेहमीप्रमाणे उत्सव साजरा व्हावा हीच श्रींकडे प्रार्थना !