गुरुपौर्णिमा २०२०

ll श्रीराम समर्थ ll
गोंदवल्याच्या चैतन्योपासना संस्थानचा जेव्हा केव्हा ऐतिहासिक आढावा घेतला जाईल तेव्हा २०२० च्या कोरोना संकट काळात  संपन्न झालेल्या सर्व उत्सवांची सविस्तर नोंद ही त्या इतिहासातील एक सुवर्णाअक्षराने लिहिलेले एक पान असेल कारण त्या पानावर श्री महाराजांच्या ईश्वरीय  सत्तेचा पूर्णपणे ठसा उमटलेले रामनवमी उत्सव, श्रीकृष्ण स्थापनेचा १०० वा वर्धापन दिन व नुकताच संपन्न झालेला गुरुपौर्णिमा उत्सव यांचा अंतर्भाव निश्चितच असेल आणि तो एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून जपला जाईल यात शंकाच नाही. वरील तीन उत्सवांपैकी पहिल्या दोन उत्सवांचा आढावा यापूर्वीच आपण  घेतलेला  आहे.  नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा वृत्तांत आपल्यापुढे ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न.
जेष्ठ पौर्णिमा, ५ जून २०२० ला कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने पार पडली आणि श्री गुरुपौर्णिमेचे वेध लागण्यास सुरवात झाली. त्यात कोरोनाने उग्ररूप धारण केल्यामुळे मनुष्य स्वभावास अनुसरून साहजिकच एक प्रकारचे अनिश्चिततेचे व चिंतेचे वातावरण गोंदवल्यास निर्माण झाले. कारण त्यावेळी विश्वस्तांपैकी कुणीही गोंदवल्यास नव्हते आणि चार पैकी तीन पंच परीस्थितीच्या रेट्यामुळे येण्याची शक्यता नव्हती. असे असून सुध्दा महाराजांच्या अस्तित्वाचा मागील अनुभव पाठीशी असल्यामुळे ही गुरुपौर्णिमा अशाही परिस्थितीत चांगली होण्याची आशा वाटत होती आणि ही आशा निरर्थक ठरली नाही ही श्रींचीच कृपा, हे पुढील घटनाक्रमावरून नक्कीच लक्षात येईल.
जसजसा गुरुपौर्णिमेचा उत्सव जवळ येत होता तसतसा कोरोनाचा महाराष्ट्रावरील प्रभाव वाढत होता. मग परिस्थितीशी जुळवून घेत उत्सवाच्या आखणीला सुरवात झाली ती पुण्याहूनच! त्यानुसार श्री पाठक काका, परांजपे काका आणि मनोहर काका येऊ शकणार नाहीत हे जवळ जवळ निश्चित झाले व फक्त डॉ गुळवणी काका उत्सवासाठी येतील हेही ठरले. गोंदवल्यातील सेवेकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उत्सवातील काही कामे नेमून देण्यात आली त्यात प्रामुख्याने पुरुषांचे व महिलांचे पहारे, कोठीतील नियोजन, उत्सवातील नित्यनैमित्तिक उपासना, पंढरपूर दिंडीचे परिस्थितीनुसार नियोजन आणि उत्सवातील इतर पूरक कामेही ठरली. 
पंचाच्या सूचनेनुसार वाटून दिलेल्या सर्व कामांना गती मिळाली. सेवेची सर्व चक्रे आपापल्या मर्यादेत फिरू लागली. मनुष्य बळ कमी असूनही गुरुबळ मोठे असल्यामुळे सेवा करणाऱ्यांचा उत्साह मोठा होता म्हणून पाहता पाहता सर्व कामे आटोक्यात येऊ लागली.  वरील महत्वाच्या कामापैकी थोडे आव्हानात्मक काम होते  पंढरपूर दिंडीचे! तीही प्रातिनिधीक स्वरुपात करण्याचे ठरले तसेच उत्सवा दरम्यान करायच्या पहाऱ्याचेही श्रींच्या प्रेरणेने उत्तम प्रकारे नियोजन झाले . 
ग्रामस्थांबरोबरच्या चर्चेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर दिंडीचे प्रातिनिधीक स्वरुपात प्रस्थान करण्यासाठी दि 26 जूनला        सकाळी ८.३० वाजता काही मोजके वारकरी टाळ मृदुंग विणेसह श्रींच्या समाधीमंदिरा समोरील पटांगणात जमले. वारकऱ्यांच्या व सेवेकरी/ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत श्रींच्या पादुकांची विधीवत पूजा, आरती, अभंग होऊन श्रीमहाराजांच्या व विठ्ठलाच्या जयघोषात हया नाविन्यपूर्ण दिंडीचे प्रस्थान झाले. श्रींच्या पादुकांची जबाबदारी श्री सुधीर जोशी यांच्यावर सोपवली गेली, त्यांच्या सोबत वारकरी मंडळी टाळ, मृदुंग पताका घेऊन मंदिरातून बाहेर पडले अशी ही दिंडी ग्रामप्रदक्षिणा करून श्री राम मंदिरात थोडा वेळ विसावली. तेथील भजन आरती आटपून वेशीपर्यंत जाऊन परत समाधी मंदिरात आली. मंदिरात श्रींच्या पादुका प्रल्हाद इमारतीच्या एका कक्षात ठेवण्यात आल्यावर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. श्रीच्या पादुकांची पूजा रोज दोनदा होत असे.  आषाढी एकादशीस  सकाळी ८ वाजता पुन्हा वारकऱ्यांचा मेळा जमवून डॉ गुळवणी काकांच्या उपस्थितीत श्रींची पूजा, आरती व भजन होऊन दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. 
पंढरपूर मार्गावर चार पावले जाऊन, ग्रामप्रदक्षिणा करून गावकऱ्यांनी मनोमन वारी केली. त्यानंतर समाधी मंदिरात या दिंडीची सांगता करण्यात आली. अशा रितीने शिस्तबद्ध रित्या व कोरोना विषयक सर्व बंधने पाळून अगदी थोडक्यात वारीचा आनंद सर्वांनी लुटला, हे या वर्षीच्या वारीचे वैशिष्ट्यच ठरले.
वारीच्या प्रातिनिधिक प्रस्थानानंतर २८ जूनला श्रीगुरुपौर्णिमेचा उत्सव नेहमीच्या पारंपारिक थाटात अतिशय उत्साहाने सुरु झाला. श्रींची समाधी विविधरंगी फुलांनी व हारांनी सजविण्यात आली, मंगल निदर्शक केळीच्या कमानींनी आवार सजले, उत्तमोत्तम रांगोळ्या ठिकठिकाणी काढण्यात आल्या त्यामुळे उत्सवाचे असे आनंददायक वातावरण निर्माण झाले. पहाटेची पूजा काकड आरती, पंचपदी भजन झाल्यानंतर नेहमी प्रमाणे दोन पहारे नामजप (महिलांचा) व भजन (पुरुषांचा) असा सुरु झाला. अर्थातच पहाऱ्यापासूनच्या उत्सवाची सुरुवात तिथे उपस्थित असलेले पंच डॉ. गुळवणी यांच्या शुभहस्ते झाली.  डॉ. गुळवणी यांनी उत्सवाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन इतर पंचांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही हे विशेष. पहाऱ्याची सुरवात झाल्यानंतर ८.३० वाजता सद्गुरू लीलामृत पोथीचे सामुदायिक पारायण दररोज दोन तास होत असे. अशारितीने श्रीगुरुपौर्णिमेपर्यंत ( दि ५ जुलै ) श्रींच्या नित्यउपासनेव्यतिरिक्त उत्सवाचे सर्व नैमित्तिक कार्यक्रम म्हणजे पुरुष व महिलांचे पहारे, पोथी, पारायण,  ब्रह्मानंद हॉल मधील सामुहिक जप इत्यादी यथासांग पार पडले. दि. 4 जुलै रोजी बेंदूर सणही पारंपारिक पद्धतीने गोशाळेत साजरा करण्यात आला. तसेच उत्सव काळात स्वयंपाकघरात दरवर्षीप्रमाणेच पण मर्यादित प्रमाणात गुरुपौर्णिमेच्या प्रसादाचे लाडू करण्यात आले त्यात सर्व महिलांनी भाग घेतला.
दि. ५ जुलै गुरुपौर्णिमेचा दिवस उगवला. उपस्थितांना पहाटे काकड आरतीच्या मंगलसमयी दिसले ते अत्यंत मनोहारी असे दृश्य !  विविधरंगी फुलांनी व हारांनी सजवलेली श्रींची समाधी, सहा ठिकाणच्या उत्तमोत्तम रांगोळ्यांनी सजलेला मंदिर परिसर, पहाटेच्या शांत वातावरणात पहाऱ्याच्या व पंचपदी भजनांच्या टाळांची किणकिण, अखंड नामस्मरणात रंगलेले (जपाचे) पहारेकरी, या सर्वांमुळे समाधी मंदिरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. हे सर्व पाहून उपस्थित सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे समाधान स्पष्ट दिसत होते. पहाटेची पूजा, अभिषेक झाल्यावर सकाळी ९ ते 10 दरम्यान भिक्षाफेरी, श्रींचा नैवेद्य व पहारा समाप्ती होऊन या वर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली. या वर्षीच्या या उत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात रांगोळ्यासहित सर्व सजावटीत हिरिरीने भाग घेतलेल्या मंदिर परिसरातील सेवेकऱ्यांच्या सर्व मुलामुलींचे कौतुक डॉ. गुळवणीकाकांनी सर्वांना शाल, कफनी व लाडू देऊन केलं. मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून श्रीमहाराजांनी पुढील पिढी घडविण्याचे काम हाती घेतल्याचे जाणवले.
एकंदरीत, गुरुपौर्णिमेचा हा उत्सव अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना समाधानकारक पार पडला हे म्हणत असताना, हे मानवी शक्तीचे काम नसून श्री महाराजांच्या  'कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम् ' शक्तीचे सामर्थ्य आहे हेच म्हणणे उचित ठरेल. आणि हे सामर्थ्य अबाधित राहण्यासाठी श्रींना आवडणाऱ्या अखंड नामस्मरण, सगुणोपासना आणि अन्नदान या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करणे आपले कर्तव्य ठरते त्यामध्ये  कसूर होऊ नये हीच मनोकामना आहे. ती श्रींनी पुरवावी एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना !
ll जय जय रघुवीर समर्थ ll