नरदेह मातीची खाणी। त्यामाजी नामाची पेरणी ।

गुरुपौर्णिमा २०२०, चिंचवडचे श्रींचे भक्त श्री प्रशांत कुलकर्णी यांनी लाॅक डाऊन काळात केलेली एक कल्पक कलाकृती -

या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला,प्रशांत कुलकर्णी या कलाकाराचा कृषीवल कसा झाला,त्याची ही कथा- - -
नवरात्रात घरोघरी घट बसवितात आणि शेतं पिकवितात.या कल्पनेचे बीज प्रशांतच्या मनात घट्ट रुजले. त्या कल्पनेला व्यापक रूप देताना घरच्या घरीच एक वाफा तयार केला.या जल वार योजनेत ज्वारी, मोहरी, उडीद, नाचणी, राजगिरा अशी विविध प्रकारच्या आणि भिन्न आकाराच्या धान्यांची पेरणी केली.त्यामधून उगवली, इवली इवली हिरवीगार रोपे.पण, ही पेरणी अशा कल्पकतेने केली,की त्यामधून,महारांजाची सुंदर प्रतिमा साकारली.
   या रोपांना जीवापाड जपले.लहान बालंकाप्रमाणे,दर दोन तासांनी पाणी पाजले. कुणालाही,कुठेही कात्री नाही लावली. त्यांची नैसर्गिक वाढ होऊं दिली.
आणि 
या घरच्या शेतात महाराज अवतरले. अर्थातच ,ही सारी महाराजांचीच कृपा आणि किमया.आम्ही आर्ततेने हांक मारतांच,महाराज अक्षरश:मातीतून प्रकट होतात,हे मात्र खरें.

।। श्रीराम समर्थ ।।


पेरिले ते उगवावे ।
या निसर्ग चक्रासवे ।
धान्ये रूजविता पहावे ।
रान  हरित तृणांचे ।।

या रानामधुनी पेरणी ।
ज्वारी मोहरी नाचणी।
राजगिरा संगे घेऊनी ।
रंग उमटले कौतुके ।।

अवघा रंग एकची झाला।
वंदूनी भावे गुरुचरणाला ।
अरूपाचे रुपी प्रकटला।
मूर्तीमाजी सद्गुंरूंच्या।।

अन्नदानावरी अती प्रीती ।
अखंड वदला जो नामकीर्ती।
आनंद होते त्यांचे चित्ती।
तृणांकुर पाहोनिया।।

नरदेह मातीची खाणी।
त्यामाजी नामाची पेरणी ।
अर्पिता गुरुकृपेचे पाणी ।
पीक उगवे परमार्थाचे।।

"हाचि सुबोध देण्यासाठी।
मी आलो तुमच्या भेटी ।
का उगाच होता कष्टी ।
नाही नाही मी गेलो।।"

जय जय रघुवीर समर्थ ।।