श्रीगोपालकृष्ण शताब्दी सोहळा - ५ मे २०२०

ll श्रीराम समर्थ  ll

आज मंगळवार वै. शु. १२ शके १९४२ दि: ५ मे २०२० गोंदवल्या बाहेरील कोव्हिड -१९ ने त्रस्त झालेल्या जगाच्या दृष्टीने एक अतिसामान्य / नगण्य  दिवस. परंतु गोंदवल्यातील श्री गोंदवलेकर महाराज समाधी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या साधकांच्या दृष्टीने हा एक महत्वाचा दिवस! कारण आजच्या दिवशीच बरोबर १०० वर्षापूर्वी (वै. शु. १२  शके १८४२ ) श्री महाराजांच्या समाधी स्थानाच्यावर बांधलेल्या मंदिरात श्री गोपाळकृष्णाच्या सुबक, सुंदर मूर्तीची स्थापना तत्कालीन पंच श्री बापूसाहेब साठ्ये यांच्या हस्ते करण्यात आली. हे मंदिर श्रीब्रह्मानंद महाराजांच्या योजनेनुसार सज्जनगडाच्या धर्तीवर  (खाली श्री समर्थ समाधी व त्यावर राम मंदिर तर त्याऐवजी  येथे श्री कृष्ण मंदिर एवढाच फरक) बांधण्यात आले आणि त्यात स्थापिलेली श्रीगोपालकृष्ण मूर्ती श्री महाभागवत (डॉ.  कुर्तकोटी) यांनी करवुन आणली होती. या महत्वाच्या घटनेचे स्मरण म्हणून त्यावेळची निमंत्रण पत्रिका सोबतच्या फोटोत पहावयास मिळेल.

वरील महत्वपूर्ण घटनेच्या शताब्दीपूर्तीचे वर्ष म्हणुन या वर्षी वैशाख शु. १२ (दि ५/५/२०) या दिवशी चैतन्योपासना ट्रस्टने एक मोठा कार्यक्रम करण्याचे योजिले होते, परंतु कोरोना विषाणूच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही  ही श्रींचीच इच्छा असावी. परंतु या संकटात श्रींचा समाधी मंदिर परिसर सुरक्षित राहिला हे विशेष!. अशाच सुरक्षित (श्री ‘रक्षित’) वातावरणात श्री रामनवमी उत्सव पडला. या काळात  मंदिर परिसरातच वास्तव्यास असणाऱ्या विश्वस्तांचा व मोजक्या श्रीभक्तांचा श्रींचे कुठलेही कार्य करण्याच्या बाबतीतला उत्साह तसूभरही कमी झाला नाही .

या पार्श्वभूमीवर श्री श्रीगोपालकृष्ण स्थापनेच्या दिवसाच्या ( ५/५/२०२०) कार्यक्रमाची आखणी ३-४ दिवस आधीपासून सुरू झाली . त्यात मुख्य कार्यक्रम म्हणजे या दिवशी सकाळी ९ ते १० वेळेदरम्यान श्रीगोपालकृष्णाचा पवमान अभिषेक व विष्णू सहस्त्र नामाचे १०८ पाठ करण्याचे ठरले. कुठलाही कार्यक्रम एकदा निश्चीत झाला की, तो श्रीमहाराजांचाच संकल्प असे मानून कार्यकर्ते (मग संख्येने कितीही असोत) उत्साहाने कामाला लागतात ही गोंदवल्याच्या समाधी मंदिर परिसराच्या मातीचे वैशिष्ट्य आहे आणि याही कार्यक्रमाच्या बाबतीत हेच घडले. दि. ४/५/२०२० ला सकाळपासूनच कामाला सुरूवात झाली. उत्सवासाठी शुभनिदर्शक म्हणुन केळीचे खुंट रोवणे, उत्तम रांगोळ्या काढणे, श्रीगोपालकृष्णासमोर पुष्पसजावट करणे, समाधी मंडपात आसन व्यवस्था करणे, मंद रोषणाई करणे, प्रसादाची तयारी इ. कामे रात्री पर्यंत पूर्ण झाली.  श्रीमहाराजांना श्रीविष्णूसहस्त्रनाम अतिशय आवडत असे. अशा या श्रीविष्णूसहस्त्र नामाच्या पाठाची १०८ आवर्तन हे या दिवसाचे प्रमुख वैशिष्ट्य. विश्वस्तांच्या देखरेखीखाली पाठासाठी श्रींच्या भक्तांची यादी तयार करण्यात आली आणि त्यानुसार सर्वांना सूचना देण्यात आल्या .

सर्व तयारी पूर्ण झाली आणि मंगळवार वै. शु. १२ (दि: ५/५/२०२०) हा दिवस उगवला. पहाटे श्रींच्या समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमी प्रमाणे होऊन ८ वाजता श्रीगोपालकृष्णाला पवमानाचा अभिषेक सुरू झाला. पवमान अभिषेक संपताच विष्णू सहस्त्रनाम पाठ करणारे सर्व भक्त साधी आसने आणि खुर्च्यांवर विराजमान झाले. विश्वस्तही (सपत्नीक) आपल्या नियोजित जागी स्थानापन्न झाले.

ठरल्याप्रमाणे बरोबर ९ वा. ५ मिनिटांनी श्रीविष्णू सहस्त्रनामाच्या पाठास सुरूवात झाली. पाठ चालू असताना आळीपाळीने, सर्व विश्वस्तांनी (सपत्नीक) श्रीगोपालकृष्णाला तुळशीदले अर्पण केली. येथे महत्त्वाची  गोष्ट नमुद करावीशी वाटते की, श्रीमहाराजांचे कुठलेही काम असो त्यास लागणाऱ्या सामुग्रीचा तुटवडा भासू लागण्याचा अवकाश की, श्री महाराज ती सामुग्री (वस्तू) एखाद्या भक्तामार्फत पुरवून व्यवस्थापनाची काळजी दूर करतात. तसेच यावेळीही घडले. या वर्षीच्या कडक उन्हाळ्यातही तुळशीअर्चनासाठी खूप प्रमाणात लागणारी तुळशीदले (ती ही कोवळी ) गावात राहणाऱ्या श्री गुधाटे यांनी नुसत्या फोनवरुन मान्य करून पुरविली व कार्यक्रमाची शोभा वाढविली . श्री विष्णूसहस्त्र नामाचे पाठ शिस्तीत बसलेल्या भक्तांनी (स्त्री- पुरूष दोन्ही ) एका सुरांत म्हणण्यास सुरूवात करतात एका यज्ञीय कर्माचे  वातावरण निर्माण झाले. भगवंताने गीतेत म्हटलेच आहे 'यज्ञांना जपयज्ञोस्मी'. श्रीविष्णूच्या एक हजार नामाचा जप हा जपयज्ञच नव्हे का? अशा रितीने या जप यज्ञाचा १०८ पाठाचा संकल्प बरोबर १० वाजून ०५ मिनिटांनी (१ तासात) पूर्ण झाला. या पाठानंतर रामह्रदय व नामस्मरण संपन्न होऊन श्रीगोपालकृष्णास नैवेद्य आरती झाली. श्रीगोपालकृष्णाची आरती होत असताना श्रीगोपालकृष्णाचे सहस्रावधी तुलसीदलाने मंडित रूप इतके सुंदर दिसत होते की, " चराचर मोहिले तुझी मूर्ती पहावया " या काकड आरतीचा एका ओळीतील शब्दांची प्रचिती सर्वांना आली. यानंतर सर्वांना दर्शन-प्रसाद होऊन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे फलीत एकच कर्तव्यपूर्तीचे समाधान.

कोरोना संकटाच्या काळातच अत्यंत उत्साहात पार पडलेला रामनवमी उत्सवानंतरचा हा दुसरा कार्यक्रम, नव्हे नव्हे ही श्रींची आपणा सर्वांस समाधानस्वरुप अनुपम भेटच.

ll जय जय रघुवीर समर्थ ll