तमसो मा ज्योतिर्गमय ! रामनवमी २०२०

|| श्रीराम समर्थ ||

५ एप्रिल २०२०. आज सर्व जग करोनाच्या भीषण संकटाचा सामना करत असताना , माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, या संकटावर मात करण्यासाठी विश्वकल्याणाची भावना मनात ठेवून श्री महाराजांना मनोभावे प्रार्थना करण्यात आली. या अंध:कारातून तेजाकडे नेणाऱ्या शेकडो ज्योतींनी समाधी मंदिराचा परिसर उजळून गेला. यावेळी उपस्थितांनी श्रीराम नामाचे मनोभावे स्मरणही केले.अत्यंत शांत व पवित्र वातावरणात, मंद तेवणाऱ्या समयांच्या प्रकाशात झालेले समाधीचे दर्शन भाविकांच्या मनाला या अस्थिर काळातही शांती व धीर देत राहील यात शंका नाही.

या वर्षीच्या कठीण परिस्थितीतही अनोख्या परंतु श्रींना आवडेल अशा पद्धतीने नुकत्याच पार पडलेल्या श्रीराम नवमीच्या उत्सवाचे उपस्थितांना फार समाधान वाटले. या वेळी येथे हजर असणाऱ्यांपैकी एका सेवेकऱ्याचे मनोगत याची साक्ष ठरेल. 

रामनवमी उत्सव २०२०- एक अविस्मरणीय अनुभव  
“सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी” 
“महाराजांसमान नाही त्रिभुवनी, आनंदाची खाणी गुरुराव”
या सारखी आपल्या सद्गुरुंवरील पदे आपण नेहेमी म्हणतो परंतु मोठी संकटे आपल्यावर अथवा आपल्या समाजावर कोसळतात तेव्हा मात्र आपले धैर्य अनाहूतपणे खचते व आपल्या पाठीराख्या सद्गुरूला विसरून जातो. भीती व काळजी आपल्या मनाचा ताबा केव्हा घेते हे कळतही नाही. पण संत / सद्गुरूंची दया अशी असते की कितीही मोठे संकट येवो, त्याची आंच न लागू देता आपले पालन व रक्षण करतात. 
याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सध्याच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुर्दम्य उत्साहाने पार पडलेला श्री रामनवमी उत्सव ! उत्सवाचा पुढील वृत्तांत म्हणजे श्रींच्या सत्तेची प्रचीती-
यंदाची फाल्गुनी पौर्णिमा नेहमीच्या उत्साहात पार पडली. आता काही दिवसातच राम नवमी उत्सवाचे पडघम वाजणार इतक्यात कोरोना नावाच्या भयंकर विषाणू संसर्गाचे आगमन महाराष्ट्रातही झाल्याच्या बातम्यांनी सर्वांनाच हवालदिल केले. मुंबई, पुण्यात लागण सुरु होऊन रोगाचा प्रसार सुरु झाला व सरकार निर्देशित कर्फ्यू व लॉकडाऊन ची साखळी सुरु झाली आणि गोंदवल्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले. सरकारी आदेशानुसार मंदिर दर्शन व भोजन व्यवस्था पूर्ण बंद करण्यात आली. त्यात रामनवमी उत्सव आठवड्यावर आलेला व संस्थानचे विश्वस्त अजूनही पुण्यात अडकलेले!
अशा परिस्थितीत रामनवमी उत्सव होणार की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला. 'आनंदाची खाणी' जवळ असूनही आम्हाला काळजीने ग्रासून टाकले. प्रत्येक संकटातही त्यांचा हात बघण्यात अजूनही आपण कमी पडतो हेच खरे! पण दयासिंधु महाराजांच्या योजनेप्रमाणे एक एक गोष्टी अनुकूल घडू लागल्या.
प्रथम विश्वस्तांपैकी श्री मनोहर काका पोहोचले. सुदैवाने त्यावेळी रस्ते खुले होते. ते आले व उत्सवाच्या आखणीला सुरुवात झाली. त्यांच्यापुढे मुख्य प्रश्न होता तो रामनवमी उत्सवात पहाऱ्यासाठी सेवेकरी नेमण्याचा. कारण मठात त्यावेळी फक्त १०-१५ सेवेकरी होते. पोलिसांचा पहारा कडक होता व बाहेरून परगावातून कोणी येऊ शकत नव्हतं. मोजक्या लोकात ९ दिवस - २४ तास पहारा चालवणे सोपे नव्हते. पहारा सुरु होईल की नाही ही शंका यावी अशी परिस्थिती होती. पण ती महाराजांनी निरर्थक ठरवली. सेवेकऱ्यांबरोबरच संस्थान मधील काही कर्मचारी व ग्रामस्थ पुढे आले व सर्वांच्या सहकार्याने ही व्यवस्था सुरेख लागली. एक नवा व चांगला पायंडा पडला व मोठा प्रश्न सुटला. 
संस्थानचे पंच, श्री पाठक काका पुण्याला अडकलेले व कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी मुळे येऊ शकत नव्हते. पण पोलिसांची परवानगी मिळाली व ते सपत्नीक सुखरूप पोहोचले. ते आल्यावर उत्सवाच्या आखणीला वेग आला. जमावबंदी आदेशानुसार उत्सवाच्या कोणत्याही कार्यक्रमास ५ माणसांपेक्षा गर्दी होऊ नये असे सूत्र ठरले. सर्व साग्रसंगीत तयारी पूर्ण होऊन चैत्र पाडव्याला गुढी उभारून उत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण उत्सवात गर्दी कमी असूनही उत्सवाच्या आनंदात व उत्साहात कुठलीही कमतरता जाणवली नाही,ही किमया अर्थातच श्री महाराजांची !
उत्सवातील प्रत्येक कार्यक्रम  मग तो काकड आरती असो, भजन, अभिषेक, पहारा, दैनंदिन रामपाठ, विष्णू सहस्र नाम असो, वा पंचपदी भजन असो, राम जन्म वा उत्सव समाप्ती असो, अत्यंत आखीव रेखीव झाला. कार्यक्रमांचे उत्तम नियोजन, कार्यवाही व दररोज सुग्रास ( प्रसाद) भोजन यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती.
वरीलप्रमाणे उत्सवाची उपासनेची बाजू जरी व्यवस्थितपणे पार पडत असली तरी श्री महाराजांना आवडणारे व उत्सवाला शोभणारे अन्नदान परिस्थितीच्या रेट्याने होत नाही याची खंत सर्वाना होती. मात्र श्रींच्याच प्रेरणेने एक अभिनव कल्पना पुढे आली आणि पोलिसांच्या सहाय्याने १३०० च्या वर गोरगरीब, शेतमजूर, वाड्या वस्त्यातील असहाय्य कुटुंबाना यांना एक महिना पुरेल एव्हढी अन्नसामुग्री (गहू तांदूळ, रवा, साखर, तेल, बेसन, डाळ इ.) पोहोचविण्यात आली. श्रीमहाराजांनीच आपले आवडते अन्नदान अशा अविस्मरणीय पद्धतीने करवून घेतले यात शंका नाही.   
देहात असताना देखील २ दुष्काळात श्री महाराजांनी त्यावेळच्या संस्थानिकाना लाजवेल असे अन्नदान केले होते याची आठवण होते.
चमत्कार म्हणजे हे अन्नदान झाल्यावर, कोणीही न मागता,  लगेचच एका भक्ताकडून १० टन धान्य देणगी म्हणून आले. भगवंताच्या नावाने निस्वार्थी पणे जर दिले तर श्रीमहाराज कधी कमी पडू देत नाहीत याची ही प्रचीती ! याच अर्थाने गोंदवल्याच्या समाधीस्थानात ऋद्धी सिद्धी वास्तव्य करून आहेत. एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताला लगेच प्राप्त  होते हा इथला नित्य अनुभव आहे. 
वरीलप्रमाणे अन्नसामुग्रीच्या (शिधावाटप) व्यवस्थेबरोबरच, पंतप्रधान निधीला रु ५० लाख व ससून हॉस्पिटलला रु २५ लाख एव्हढी रक्कम देणगी म्हणून संस्थानकडून श्रींनी करविली. एकंदरीतच या वर्षीचा राम नवमी उत्सव आगळा वेगळा व संस्मरणीय झाला यात शंकाच नाही.म्हणूनच म्हणावेसे वाटते 
“महाराजांसमान नाही त्रिभुवनी, आनंदाची खाणी गुरुराव”
आपल्या व समाजाच्या कठीण काळातून पार पडण्यासाठी त्यांच्या चरणी  मनःपूर्वक प्रार्थना !
जानकी जीवन स्मरण जय जय राम !