पुण्यतिथी उत्सव २०१९ क्षणचित्रे – गुलाल

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १०६ वा पुण्यतिथी सोहळा दि. २१ डिसेंबर २०१९ रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.  गुरू माउलींच्या पुण्यस्मरणानिमित्त रात्रीपासूनच संपूर्ण गोंदवलेनगरी रामनामात तल्लीन झाली होती. मनात फक्त गुरू माउलींच्या समाधी दर्शनाची आस होती. रघुपती राघवच्या भजनाने भक्तिमय झालेल्या वातावरणात पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी समाधी मंदिरातील श्रीरामाचा जयघोष ओसरला अन् पुण्यकाळाच्या क्षणी लाखो भाविकांनी श्रीरामाचा जयघोष करत ब्रह्मचैतन्यांच्या समाधीवर गुलाल फुलांची उधळण केली.

श्रींचा १०६ वा पुण्यतिथी महोत्सव १३ डिसेंबरपासून कोठी पूजनाने सुरू झाला होता. या निमित्ताने समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. त्याबरोबरच मान्यवरांच्या प्रवचन, कीर्तन, भजन, गायन आदी कार्यक्रमांची देखील रेलचेल सुरू होती. शनिवारी पहाटे श्रींच्या पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम असल्याने  एक दिवस आधी पासूनच भाविक गोंदवल्यात दाखल झाले होते. त्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून मात्र भाविकांच्या गर्दीत वाढ होत गेली  आणि साडेपाचच्या सुमारास समाधी मंदिर परिसर भाविकांनी भरून गेल्याने मुख्य चौकापर्यंत सातारा, पंढरपूर रस्त्यावरही  भाविकांचीच गर्दी दिसत होती. ‘श्रींच्या पुण्यकालानिमित्त गावातही विविध ठिकाणी रात्रभर भजन सुरू होते.

या वर्षी भव्य मंडपात प्रवचनांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या भव्य प्रतिकृतीवर श्रींची प्रतिमा विराजमान होती. श्रींच्या ३६५  प्रवचनांचे पुस्तक आज हजारो घरांमध्ये नित्य नियमाने वाचले जाते.  चिंचवडचे श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही सजावट भाविकांना आनंद देऊन गेली.  त्या दिवशी पहाटे सनई वादनानंतर ब्रह्मानंद मंडपात काकड आरती करण्यात आली. ईशस्तवनानंतर रामदास आचार्य व महेश काळे यांच्या सुरात सूर मिसळून भाविकांनी ‘रघुपती राघव’ हे सामूहिक भजन केले. रवींद्र पाठक यांचे प्रवचन होताच महानिर्वाणापूर्वीचे  श्रीमहाराजांच्या शेवटाच्य दोन दिवसा विषयीचे कीर्तन कानी पडले अन् भाविकांचे मन भरून आले. 'श्रीं'च्या महानिर्वाणाचा तो पुण्यकाल जवळ येताच समाधी मंदिरातील ‘श्रीराम’ ‘श्रीराम’ असा  जयघोष ओसरला आणि भाविकांनी गुलाल, फुलांची उधळण केली. गुलालाचा हा मुख्य कार्यक्रम होताच श्रींची आरती व श्लोक पठण करण्यात आले. त्यानंतर गुरू माउलींच्या समाधी दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांनी 'श्रीं'च्या चरणी माथा टेकला.

सकाळी गुलालाच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी अश्विनी सोनवणे, पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ उपस्थित होते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरातील गुलालाचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी जागोजागी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते.

अद्याप थंडीचा कडाका नसल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे जाणवत होते. दरम्यान सकाळी आठच्या सुमारास रामदासी भिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तर सकाळी दहाच्या सुमारास श्रींची पालखी मिरवणूक नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. नगरप्रदक्षिणेनंतर परतलेल्या पालखीचे मंदिरात सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर आरती होऊन भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

एकादशीच्या दिवशी रविवारी पहाटे पाच वाजता 'श्रींची पालखी मिरवणूक निघाली व  थोरले श्रीराम मंदिरासमोर भारुडी भजन झाल्यावर वैभव चौकातून ही मिरवणूक पुन्हा मंदिरात पोहोचली. त्यानंतर हभप रामदासी आचार्य यांचे लळिताचे कीर्तन झाले.

२६६ कोटींचा श्रीराम नामजप :

गेल्या पुण्यतिथी महोत्सवानंतर वर्षभरात मंदिर परिसरात १६ कोटी ७८ लाख ६६ हजार व बाहेरगावाहून आलेला २४९ कोटी ४८ लाख ९१ हजार असा मिळून २६६ कोटी २७ लाख ५७ हजार इतका श्रीराम नामजप आज सकाळी श्रींच्या समाधीवर अर्पण करण्यात आला, तसेच येत्या वर्षभरासाठी तेरा कोटी रामनाम जपाचा नव्याने संकल्प करण्यात आला.

अशा तऱ्हेने श्रींचा १०६ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या आनंदात पार पडला.