पुण्यतिथि उत्सव २०१९ – क्षणचित्रे...

श्री क्षेत्र गोंदवले येथे शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०१९ (मार्गशीर्ष कृ. प्रतिपदा) पासून श्री. महारांजांचा १०६ वा पुण्यतिथि महोत्सव “कोठीपूजनाच्या” कार्यक्रमाने, मंगलमय वातावरणात व अतिशय दिमाखात सुरू झाला. शुभारंभाच्या दिवसाची काही ठळक वैशिष्ठ्ये:

- यंदा प्रथमच “सरस्वती” पूजनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यात सरस्वतीच्या मूर्तीचे चरणी श्री महाराजांची प्रतिमा ठेवून त्यासोबत श्री महाराजांची ग्रंथसंपदा, दासबोध, भगवतगीता, राम चरित मानस, पू. बाबा बेलसरे यांचे श्री. महाराजांचे चरित्र व वाङमय इत्यादींचा आवर्जून समावेश करण्यात आला होता. जणू काही श्री. महाराज त्यांच्या उपदेशाचे मर्म सरस्वती मातेच्या माध्यमातून सर्व भक्तांना सांगत आहेत अशी भावना सर्व उपस्थित भाविकांना मनोमन जाणवत होती.

- या वर्षी श्री महाराजांच्यासाठी चांदीची पालखी, कर्नाटकातील बंगळूर येथील कुशल कारागीरांकडून नव्याने तयार करून घेण्यात आली. या पालखीचे स्वरूप अतिशय देखणे असून त्यामुळे आपल्या संस्थानाच्या वैभवात नक्कीच भर पडेल.

- उत्सव कालावधीत मंदिर परिसरात होणार्‍या सर्व कार्यक्रमाचा भाविकांना पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी कायमस्वरूपी प्रशस्त मांडव घालण्यात आला असून संपूर्ण परिसर विद्युत माळांनी सुशोभित केला आहे. आधुनिक तत्रज्ञानाचा उपयोग करून बहुरंगी माळांमधून “श्रीराम जयराम जयजयराम” ही अक्षरे सरकत्या स्वरुपात दिसतात. रात्रीच्या वेळी हे विलोभनीय दृश्य अतिशय मनोहारी दिसते.   

- गतवर्षीप्रमाणे यंदाही कोठीपूजन समारंभाचे थेट प्रसारण आपल्या वेबसाइटमार्फत YouTube व Facebook च्या माध्यमातून करण्यात आले. जगभरच्या लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला व हे  अविस्मरणीय क्षण हृदयात जतन करून ठेवले.

- श्री महाराजांचे एक निस्सीम भक्त, चिंचवड येथील श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी याही वर्षी "श्री रामनाम आणि श्री महाराज यांच्यामधले अद्वैत व्यक्त करणाऱ्या अलौकिक कलाकृतीचे सादरीकरण केले. छोट्या छोट्या वस्त्रांच्या तुकड्यांमधून, सुईच्या सहाय्याने विविध रंगाच्या गुंडाळया तयार करून नाडीसारख्या किंवा आपल्या काकड्याच्या वातींच्या आकाराच्या या नळ्यांमधून "श्री राम जय राम जय जय राम " या तारक मंत्रांची बहात्तर वेळा मांडणी करताना रंगसंगती अशी साधली आहे की त्यातून साक्षात श्री महाराजच प्रकट झाले आहेत याची प्रचिती येते. जवळून पाहाता तारक मंत्र दिसतो व अंतरावरून पाहाताना तर श्री महारांजाचे दर्शन होईल. पुण्यतिथीच्या पर्व काळात या नामरूप दर्शनाने सर्व भाविक भारावून जात आहेत.