श्री क्षेत्र गोंदवले येथील रामनवमी उत्सव २०१९

येथील रामनवमीचा उत्सव यंदा ६ एप्रिल ते १३ एप्रिल २०१९ (चैत्र शु १ ते चैत्र शु ८) या कालावधीत थोरले राममंदिर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला. यात रोजची काकड आरती, ग्रामदेवता पूजन, धाकट्या राममंदिरातील रामपूजन तसेच श्री दत्त, देवी दुर्गा, नरसिंह, शनिदेव ह्यांच्या आरत्या यांचा समावेश होता. त्यानंतर आरतीचे प्रस्थान गणपती व गाव मारुती यामार्गे थोरल्या राम मंदिरात होत असे. तेथे विठ्ठलाची व शंकराची आरती करून थोरल्या राम मंदिरात पुढील सर्व कार्यक्रम होत होता.  त्यात पंचपदीचे भजन व त्यानंतर रामाला पवमान अभिषेक होत असे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच रामनामाच्या अखंड पहाऱ्याचे आयोजन केले होते; त्याप्रमाणे जपाचे अनुष्ठान चालू होते.  तसेच रोज दुपारी ह.भ.प. श्री. सदानंद गोखले, कल्याण ह्याचे सुश्राव्य कीर्तन होत असे. उत्सवाची सांगता रामजन्माच्या सोहोळ्याने झाली. या  दिवशी धाकटे राममंदिरात ह.भ.प. सुखदेव इंगवले, डोंबिवली यांच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.  

“आपला ‘राम’ हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून, त्या प्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल.” असा उपदेश श्री. महाराजांनी ‘रामनवमी’ च्या प्रवचनात केलेला आहे. सर्व साधकांनी हे सतत स्मरणात ठेवून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा.

यंदा चैत्रातच तीव्र उन्हाळ्याचा दाह जरी वातावरणात होता तरीही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

|| जय जय रघुवीर समर्थ ||