श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व गणेशोत्सव २०१८

श्रीराम समर्थ 
श्रीक्षेत्र गोंदवले येथे दरवर्षी प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव श्रावण वद्य प्रतिपदा  ते श्रावण वद्य  अष्टमी (२७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)  दरम्यान  अत्यंत उल्हासात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.  उत्सवकाळात दररोज अखंड नामस्मरण व टाळेवर भजनाचा पहारा होता. दररोज सकाळी श्री गोपालकृष्णास पवमान अभिषेक व श्रींच्या समाधिस रुद्र अभिषेक करण्यात आला.  दररोज विविध फुले व पोशाख यांच्या सजलेल्या  गोपालकृष्णाची सुवासिनींनी दृष्ट काढली.  
उत्सवात भागवत सप्ताहानिमित्त, वेदशास्त्र संपन्न श्री यज्ञेश्वरशास्त्री जोशी (श्री शंकराचार्य मठ, सातारा) यांची सकाळ -सायंकाळ श्रीमद्भागवतावर सुश्राव्य प्रवचने झाली. २ सप्टेंबर म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी मंदिर सुंदर फुलांनी सजले. विद्युत रोषणाई व रांगोळ्यांनी परिसर सुशोभित झाला. 
श्रीमहाराजांचे सत्शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांचे पुण्यतिथी शतसांवत्सरिक उत्सवाचे हे वर्ष आहे. त्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रथम श्रीमहाराजांच्या चरणी अर्पण करून करण्यात आले.  रात्री ११ ते १२.३० पर्यंत ह.भ.प. धनंजय गद्रे ( पाली) यांचे काल्याचे कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. त्यानंतर बाल कृष्णासाठी न्हाणी, पाळणा, आरती झाली. सामुहिक विष्णु सहस्रनामासह श्रीकृष्णास तुलसीपत्रे वाहण्यात आली. कार्यक्रम संपताना जमलेल्या भाविकांना प्रसाद व सुंठवडा वाटण्यात आला.  
३ सप्टेंबर ला पारण्याच्या दिवशी सकाळी गोपाळकृष्णासमोर काल्याचे कीर्तन झाले व त्यानंतर दहिहंडीचा  कार्यक्रम झाला.  अशारितीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव श्रीकृपेने अत्यंत आनंदात संपन्न झाला. 

तसेच दरवर्षी प्रमाणे भाद्रपद शु. चतुर्थीला म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी श्रींचे अत्यंत उत्साहात आगमन झाले. तसेच गौरींची स्थापना व पूजनही मोठ्या आनंदात पार पडले.