भक्तिरंगात रंगला पुण्यतिथी सोहळा !

गोंदवले , १२ डिसेंबर २०१७,  हजारो भाविकांनी खचाखच भरलेला मंडप ... तेवढयाच गर्दीने ओसंडलेले लगतचे रस्ते आणि मनात फक्त श्री च्या समाधी दर्शनाची आस , आशा भक्तिमय वातावरणात पाच वाजून ५५ मिनिटांनी श्रींच्या पुण्यस्मरणाची वेळ येताच , परिसरात निःशब्द शांतता पसरली व लगेचच हजारो मुखातून श्रीरामाचा जयघोष सुरु झाला आणि भक्तिरसात न्हावून  निघालेल्या भाविकांनी ब्रह्मचैतन्यांच्या समाधीवर गुलाल - फुलांचा वर्षांव केला.

     श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महारांजाचा  १०४ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक चार डिसेंबरपासून कोठी पूजनाने सुरु झाला होता . यानिमित्ताने दहा दिवसांपासून समाधी मंदिरात विविध मान्यवरांचे प्रवचन, कीर्तन , भजन ,गायन आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. मंगळवारी श्रीच्या  पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम असल्याने सोमवारी दुपारपासूनच गोंदवल्यात भाविक दाखल होऊ लागले होते. पहाटे तीन वाजल्यापासून समाधी मंदिरात भाविकांची गर्दी वाढत गेली . साडेपाचच्या सुमारास समाधी मंदिर परिसर भाविकांनी भरून गेल्याने मुख्य चौकापर्यंत सातारा -पंढरपूर रस्ता भरून गेला होता . पहाटे साडेतीनपर्यत मुखदर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते . सनई वादनानंतर चार वाजता मुख्य सभामंडपात भूपाळ्यांसह काकड आरती करण्यात आली . रघुपति राघव हे सामूहिक भजन झाल्यानंतर रवींद्र पाठक यांचे प्रवचन झाले . श्रीच्या महानिर्वाणाची वेळ जवळ येताच मुख्य समाधी मंदिरात श्रीराम चा जयघोष सुरु झाला . तीन मिनिटांच्या जयघोषानंतर पाच वाजून ५५ मिनिटांनी श्रीराम नामाच्या जयघोषात समाधीवर गुलाल -पुष्प वाहण्यात आले अन श्रींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. गुलालाच्या  या मुख्य कार्यक्रमानंतर आरती व श्लोक पठण करण्यात आले त्यानंतर गुरुमाऊलींच्या समाधी दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांनी श्रीच्या चरणी माथा टेकला . दरम्यान, सकाळी आठच्या सुमारास रामदासी भिक्षेचे आयोजन करण्यात आले होते, तर सकाळी दहाच्या सुमारास श्रींची पालखी मिरवणूक नगर प्रदक्षिणे साठी निघाली . प्रदक्षिणेनंतर परतलेल्या पालखीचे मंदिरात सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर आरती होऊन भाविकांना  महाप्रसाद देण्यात आला. 

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरातील गुलालाचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी जागोजागी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. बुधवारी पहाटे पाच वाजता श्रींची पालखी मिरवणूक निघाली व त्या वेळी थोरले श्रीराम मंदिरासमोर भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मिरवणूक मंदिरात पोचल्यानंतर ह.भ.प. रामदास आचार्य यांचे लळिताचे कीर्तन झाले. मागच्या पुण्यतिथी महोत्सवानंतर वर्षभरात केलेला २१३ कोटी श्रीराम नामजप अर्पण श्रींच्या समाधीवर अर्पण करण्यात आला. तसेच पुढील वर्षभरासाठी  तेरा कोटी रामनाम जपाचा संकल्प करण्यात आला .