थोरले राममंदिर

श्री महाराज गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर पुष्कळ लोक कुटुंबासह त्यांच्या दर्शनाला व रहाण्यास येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली. श्रीरामरायाच्या चरणी त्यांची वृत्ती तन्मय झाली होती. तसेच भगवंताचे प्रेम सर्वांना लागावे व त्यासाठी उपासनेचे केंद्र असावे म्हणून आपल्या घराच्या समोरच्या भागामध्ये प्रशस्त मंदिर बांधून सन १८९२ मध्ये रामरायाची मोठ्या समारंभपूर्वक प्राण प्रतिष्ठा करून स्थापना केली. एवढेच नाही तर रामरायासमोरची मारुतीरायांची मूर्ति श्रीमहाराजांनी आपल्या स्वत:च्या हातांनी चुना, वाळू, व मेण यांच्या सहाय्याने बनवली व स्थापन केली. स्थापनेचे अगोदर श्रीमहाराज त्यांचे रहाते घरात रहात होते. परंतु स्थापनेनंतर थोरले श्रीराममंदिरात राहू लागले ते देह ठेवीपर्यंत.

भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानात जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे शिकवण्यासाठी श्रींनी गोंदवल्यास थोरले श्रीराममंदिर स्थापन केले. मंदिरामध्ये असणारा राम केवळ मूर्ति नसून तो प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा भावनेने श्रीमहाराज वागत, व तसे वागण्याचा इतरांनाही उपदेश करीत. आपले जगणे हे सुद्धा रामाकरताच असावे असे ते आग्रहानें सांगत. आपल्याला सांभाळणाऱ्या व आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या वडील माणसाला आपल्या जीवनात जितके प्रत्यक्ष स्थान असते तितके स्थान श्रीरामरायाला कसे द्यावे हे श्रींनी प्रत्यक्ष दाखवून दिले.

श्री महाराजांसारखा सत्पुरुष जेव्हां एखाद्या मूर्तीची स्थापना करतो तेव्हां त्या मूर्तीच्या ठिकाणी वास करणारी सुप्त जाणीव जागी करतो. ती जागी करण्यास लागणारी अंत:करणाची पवित्रता आणि भावनेची परम उत्कटता दोन्ही त्याच्या अंगी असतात. नंतर अनेक वर्षे अखंड चालवलेल्या उपासनेनें त्या मूर्तीच्या भोवती एक सूक्ष्म देह तयार होतो व मूर्तीच्या चेहऱ्यावर एक अतींद्रिय तेज झळकू लागते. त्या सूक्ष्मदेहाला भक्ताच्या सहवासाची चटक लागते. श्रीमहाराजांच्या अशाच अतिशय पवित्र, अपार्थिव, नि:स्वार्थी आणि उत्कट प्रेमामुळे श्रीरामाला श्रीमहाराजांचे विलक्षण आपलेपणा चिकटले. त्यांच्या सुख:दु:खांची प्रतिक्रिया त्याच्यावर उमटू लागली. म्हणून श्रीमहाराजांच्या जीवनकालात अशाच तीन उत्कट प्रसंगी श्रीरामाच्या मूर्तीच्या डोळ्यांना पाणी आले!