२० डिसेंबर

नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य ॥

प्रारब्धानुसार देहाची गति । तेथें न गुंतवावी आपली वृत्ति ॥ प्रारब्धाने देहाची स्थिति । आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥ देह प्रारब्धानें जातो । सुखदु:ख भोगवितो ॥ जें जें काहीं केलें । तें तें फळाला आलें । म्हणून देहाची गति। ते पालटणें नाहीं कोणाचे हातीं ॥ पांडव परमात्म्याचे सखे झाले । तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥ सुदामा भगवंताचा भक्त झाला । पण दारिद्य्रांतच राहिला ॥ म्हणून देह प्रारब्धावर टाकावा । जें होईल तो आनंद मानावा ॥ जैसें दु:ख येते प्रारब्धयोगें । सुख आहे त्याचे मागें ॥ दोहोंची न धरावी चाड । नामाची ठेवावी आवड ॥ चित्त ठेवावें भगवंतापायीं । प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं॥ देहाचे भोग देहाचे माथां । कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥ प्रारब्धानें आलेलें कर्म करीत जावें । त्याचें फळ भगवंताकडे सोपवावें ॥ साधुसंत देवादिक । हे प्रारब्धांतून नाहीं सुटले देख ॥ जीवनांतील आघात प्रारब्धाचे अधीन । समाधान नसावें त्याचेवर अवलंबून । त्यांत रामाचें स्मरण देईल समाधान ॥ दुष्टाची संगति प्रारब्धानें जरी आली । तरी रामकृपेखालीं दूर गेली ॥

मुखीं असावें एक नाम । याहून दुजें पुण्य नसे जाण ॥ नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य । हा निश्चय ठेवावा मनांत । मन होईल निभ्रांत ॥ कर्तव्यीं असावें तत्पर । मुखीं नाम निरंतर ॥ नामाचें प्रेम करावें जतन । जैसा कृपण राखी धन । कारण नामच आपल्याला तारण ॥ मुखीं रामाचें नाम । बाह्य प्रपंचाचें काम । ऐसा राम जोडा मनीं । दु:खाचा लेश न आणावा मनीं ॥ आजवर राहिला वासनेचा आधार। आतां नामावर प्रेम ठेवा पुरेपूर ॥ असती पुण्याच्या गांठी । तरच नाम येईल कंठीं॥ रामाचें नांव ज्याला न होईल सहन । त्याची गति नाहीं उत्तम जाण ॥ निर्हेतुक घ्यावें नाम । जेणें जोडेल आत्माराम ॥ नामाविण जें जें साधन । तें तें कष्टास मात्र कारण ॥ देह जरी नाशिवंत । सांगितलेलें नाम आहे सत्य ॥ बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनिवार ॥ नामांत कसलेही विचार आले । तरी ते नामानें दूर सारावे भले ॥ नामस्मरणीं निदिध्यास । स्थूलाची न करावी आस ॥ अखंड राखावें समाधान । हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥ जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें । बाकी कितीजण आले गेले । मनावर त्याचा होऊं न द्यावा परिणाम ॥ परमार्थाला एकच उपाय जाण। अखंड असावें अनुसंधान ॥

३५५. देह सोपवावा प्रारब्धावर । मन गुंतवावे रामावर ॥