श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहोळा- वर्ष १०५

सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १०५ वा पुण्यतिथी महोत्सव श्रीक्षेत्र गोंदवले येथे, मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी शके १९४०, रविवार दिनांक २३ डिसेंबर ते सोमवार दिनांक ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत अतिशय दिमाखात साजरा झाला. राज्यातून व देशभरातून आलेल्या असंख्य भाविकांनी केलेल्या नामस्मरणाच्या गजराने अवघे क्षेत्र गोंदवले दुमदुमले व संपूर्ण आसमंत राममय झाला.

श्री ब्रह्मचैतन्य नामसाधना मंदिराचे उद्घाटन :

महोत्सवाच्या पूर्वसंध्येस नूतनीकरण केलेल्या “श्री ब्रह्मचैतन्य नामसाधना मंदिराचा” उद्घाटन सोहोळा धार्मिक संस्कारात व मंगलमय वातावरणात पार पडला. रोषणाईने नटलेली ही वास्तू अतिशय विलोभनीय दिसत होती.  गोंदवल्याच्या वैभवात यामुळे नक्कीच भर पडली आहे. यापुढे अनेक भाविक या मंदिराचा नामस्मरणासाठी लाभ घेऊ शकतील.

कोठीपूजन :

उत्सवाचा शुभारंभ रविवार, दि २३ डिसेंबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे विश्वस्तांच्या हस्ते कोठीपूजनाच्या कार्यक्रमाने झाला. सुरुवातीस सनईवादन होऊन नंतर वेदघोष, ईशस्तवनपर भजनाने कार्यक्रम संपन्न झाला. परंपरेनुसार श्रीब्रह्मानंदमहाराज त्यांनी दिलेल्या ‘अक्षय पिशवी’  व तीमधील चांदीच्या रुपयाचे पूजन झाले.  त्याचबरोबर पालखीतील चांदीच्या पादुकांची व श्रीब्रह्मानंदमहाराज यांच्या फोटोची पूजा करण्यात आली. कोठीतील धान्य, स्वयंपाकघरातील चुली, वगैरेंची पूजा, सगळीकडे काढलेल्या सुरेख रांगोळ्या, फुलांची, भाज्यांची सजावटीने वातावरणात चैतन्यमय झाले. त्यानंतर गोशाळेत गोमाता पूजन व स्वयंपाकघरात अग्निपूजन झाले. उत्सवाची सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

माळ व भजन पहारा : 

मंदिरातील प्रातःकालीन पूजा झाल्यावर पंचपदी भजन  व श्रींच्या समाधीपुढे संकल्पाचा नारळ ठेवून माळ व भजनी पहाऱ्यास सुरुवात झाली. या अखंड पहाऱ्याची सांगता दशमीचे दिवशी दुपारच्या महानैवेद्यानंतर झाली. मंदिराचा संपूर्ण परिसर चोवीस तास नामघोषाने चैतन्यमय झाला होता.

ब्रह्मानंदमंडप व समाधी मंदिरातील कार्यक्रम :

दहाही दिवस नेमाने सकाळी काकडआरतीने कार्यक्रमास सुरुवात होऊन संपूर्ण दिवसभर अनेकविध कार्यक्रम झाले. रोज रात्रीच्या कीर्तनाने दिवसाची सांगता झाली. अनेक ठिकाणांहून भजनी दिंड्या आल्या होत्या. भजन, कीर्तन, व अनेक प्रतिथयश गायकांनी आपली सेवा श्री महाराजांच्या चरणी रुजू केली. यावर्षी गायनाचे ६१, भजनाचे ७५, प्रवचनाचे १० व कीर्तनाचे १९ असे भरगच्च कार्यक्रम सादर केले गेले.

लघुरुद्राभिषेक : 

समाधी मंदिरातील काकडआरती नंतर निमंत्रित वैदिक मंडळींचेकडून श्रींचे पादुकांवर लघुरुद्राभिषेक व आरती झाली.

दर्शन : 

संपूर्ण उत्सवात श्रींच्या दर्शनाकरता अपार गर्दी लोटली होती व लांबलचक रांगा होत्या, तरीही दर्शन शांततेने रांगेनेच घडत होते. प्रात:कालीन महापूजेनंतर रोज श्रींचे पादुकांवर अभिषेक केला गेला.  प्रथेनुसार रोज पालखीतील पादुकांची पूजा करून श्रींच्या पादुका व फोटो ठेवून मिरवणुकीने पालखी नगरप्रदक्षिणा होते. नगर प्रदक्षिणेदरम्यान गावातील प्रत्येक मंदिरात आरती होऊन पालखी मिरवणुकीने पुन्हा समाधिमंदिराकडे येते. मग समाधी मंदिराला बाहेरून १३ प्रदक्षिणा होतात. त्या परंपरेनुसार मोठ्या उत्साहात पालखी प्रदक्षिणा पार पडली.

श्रींचे पुण्यस्मरण, दि. ३१ डिसेंबर २०१८

दशमीचे दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा-संमार्जन करून रांगोळ्या घातल्या गेल्या. मंडपात मंडळी हळू हळू जमू लागली. काकडआरतीच्या कार्यक्रमानंतर प्रथम सनई वादनाने सुरूवात झाली व नंतर  ५.३० वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे ' रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम ॥’ हे भजन एकचित्ताने सामुदायिकरित्या म्हटले गेले.

श्रींचे पुण्यस्मरणाचा क्षण समीप आल्यावर सर्व भाविक एकाग्रचित्त झाले व ५ वाजून ५५ मिनिटांनी, सर्व भक्तमंडळीनी एकाच वेळी भावपूर्ण अंत:करणाने फुले उधळून ‘श्रीराम, श्रीराम” असा केलेले गजर आसमंतात दुमदुमला. "श्रीरामदासी भिक्षा" सकाळी ८ वाजता मंदिरातून निघून गावातून जाऊन परत समाधि मंदिरात आली. नंतर समाधि मंदिरात १३ कोटी जपाची सांगता झाली व नवीन संकल्प केला गेला.

अशा तऱ्हेने गेले १०५ हून अधिक वर्षे ही परंपरा अविरत चालू आहे व आनंदाची बाब अशी आहे की भक्तांची पुढील पिढी आता या सोहोळ्यात मनोभावे भाग घेत असली तरी सर्वांचा भाव व उत्साह हा चिरंतन आहे.

विशेष उल्लेखनीय:

यावर्षीच्या पुण्यतिथी महोत्सवात घडलेल्या दोन महत्वपूर्ण विशेष घटनांची इतिहासात नक्कीच नोंद घेतली जाईल.

चिंचवड, पुणे येथील श्रीमहाराजांचे भक्त, श्री प्रशांत कुलकर्णी हे गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या व अत्यंत नाविन्यपूर्ण माध्यमातून श्रीमहाराजांची प्रतिमा साकार करतात. त्यांनी या वर्षीही एक अभिनव उपक्रम केला. त्यांनी १३०० कणसांचा वापर करून श्री महाराजांची प्रतिमा समाधी मंदिरासमोरील जागेत साकारली. ही प्रतिमा तयार करण्याची प्रक्रिया अतिशय अवघड होती. कणसांना कमी अधिक प्रमाणात उष्णता देऊन श्री महाराजांच्या चेहेऱ्यावरील छटा निर्माण  करण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. ही प्रतिमा बघून भक्त मंडळींच्या आश्चर्याला पारावार राहत नाही. यासंबंधीच्या त्यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झालेला आहे.

दुसरे असे की देशाच्या विविध भागात व जगभरात श्री महाराजांचे अनेक भक्त आहेत. त्यांना गोंदवले येथे २३ डिसेंबर रोजी झालेल्या कोठीपूजनाच्या कार्यक्रम व ३१ डिसेंबर रोजी झालेल्या गुलालाचा कार्यक्रम बघता यावा याकरिता संस्थांनच्या अधिकृत संकेत स्थळावरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. जगभरातील हजारो भाविकांनी याचा आनंद घेतला. थोडक्यात, श्रीमहाराजांचे क्षेत्र गोंदवले हे अखंड नामस्मरणाचे तिर्थपीठ असून तेथे अध्यात्म व तंत्रज्ञानाचा अपूर्व संगम झालेला पहावयास मिळतो.